कोल्हापूरची कोरोना स्थिती गंभीर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:18 AM2021-07-16T04:18:27+5:302021-07-16T04:18:27+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी हे पथक कोल्हापुरात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात तीन तास चाललेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी ...

Kolhapur's corona condition is not critical | कोल्हापूरची कोरोना स्थिती गंभीर नाही

कोल्हापूरची कोरोना स्थिती गंभीर नाही

googlenewsNext

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी हे पथक कोल्हापुरात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात तीन तास चाललेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्ह्याची कोरोना स्थिती गंभीर नसल्याचे सांगितले. असे असेल तर आधी टास्क फोर्स, नंतर आरोग्य समिती यांचे दौरे का होत आहे हा प्रश्न आहे.

डॉ. आवटे म्हणाले, जिल्ह्यात ६० वर्षांवरील नागरिकांचे ७८ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाकडून रुग्णांची शोधमोहीम, सहा मिनिटे चालण्याचा संजीवनी अभियान, महाआयुष अंतर्गत वृद्धांचे सर्वेक्षण, बेडचे व्यवस्थापन, रुग्णांना वेळेत उपचार असे चांगले नियोजन केले गेले आहे. ते अधिक प्रभावी कसे होईल यावर लक्ष दिले पाहिजे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी काय यावर ते म्हणाले, जिल्ह्यात १७ ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारले जात असल्याने ऑक्सिजनची क्षमता वाढेल. गृहविलगीकरणामुळे संसर्ग वाढत असल्याबाबत ते म्हणाले, ग्रामीण भागात सध्या २९ टक्के गृहविलगीकरणातील रुग्ण आहेत. राहण्याची स्वतंत्र सोय असेल तरच यासाठी परवानगी दिली जाते. त्यांच्यावर कंट्रोल ठेवला जातो. घरी उपचार घेत असताना रुग्णाचा मृत्यू झाला अशी एकही घटना नाही.

कोल्हापूरला डेल्टा प्लसचा धोका आहे याबद्दल ते म्हणाले, जनुकीय क्रमनिर्धारण धोरणात्मक भाग आहे. व्हेरियंट कोणताही असो नियम सारखेच पाळावे लागतात. राज्यातच काय देशभरात डेल्टा व्हेरियंट आहे. डेल्टा प्लस कोल्हापुरात नाही तो रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, पालघर येथे आढळला आहे. उलट राज्याने पुण्यातील प्रयोगशाळेसोबत विशेष करार केला असून, दर महिन्याला तपासण्यांचे १०० नमुने अधिक पाठविले जातात, त्यामुळे वेगळा स्ट्रेन असेल तर आढळून येईल.

---

मृत्यूचे सुक्ष्म ऑडिट

दीड महिन्यापूर्वी टास्क फोर्सने रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार होत नसल्याने मृत्यू होत असल्याचा निष्कर्ष काढला होता. राज्यात सर्वाधिक मृत्यू कोल्हापुरात होत आहेत यावर ते म्हणाले, मृत्युदर जास्त ही बाब खरी असली तरी जिल्ह्यात शेकडा मृत्यूचे प्रमाण २.९ वरून २.६ टक्क्यांवर आले आहे. तो आणखी कमी व्हावा यासाठी ऑडिट केले जाते, उपचाराची एखादी पद्धती निश्चित केली की सातत्याने त्यात बदल सुचविले जातात, प्रशिक्षण दिले जाते. मागील १५ दिवस ते महिन्याभरातील मृत्यूचे बारकाईने अभ्यास व विश्लेषण करावे अशी सूचना आम्ही केली आहे.

---

पूरबाधित होणाऱ्या गावांचे लसीकरण

प्रशासनाला कोणत्या सूचना देण्यात आल्या याबाबत ते म्हणाले, येथे पाऊस जास्त असल्याने १७१ गावे पूरबाधित होतात. या गावांचे प्राधान्याने १०० टक्के लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. राज्यात कोरोना संसर्ग अधिक असल्याने आरोग्य सचिवांनीदेखील लसीचा मोठ्या प्रमाणात व सातत्याने पुरवठा व्हावा अशी मागणी केली आहे. कोल्हापूरचीदेखील हीच अपेक्षा असून, आम्ही केंद्राकडे ही मागणी सादर करू, पुढील काही दिवसांत त्याचे परिणाम दिसतील.

---

दुकानांबाबत शुक्रवारी निर्णय

कोल्हापूरच्या व्यावसायिकांनी दुकाने सुरू करण्याची मागणी केली आहे, हे शक्य आहे का यावर ते म्हणाले, निर्बंध हटविताना किंवा जिल्ह्याचा स्तर ठरविताना त्या आठवड्यातील कोरोना पॉझिटिव्ह रेट विचारात घेतला जातो. आज, शुक्रवारी याबाबत निर्णय होईल.

--

Web Title: Kolhapur's corona condition is not critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.