महिला दिन विशेष : हॉलीवूडमध्ये चमकली कोल्हापूरची कन्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 12:31 AM2021-03-08T00:31:17+5:302021-03-08T00:32:59+5:30
अमेरिका, कतार, दुबई आणि इराक तसेच भारत या ठिकाणच्या पेट्रोलियम क्षेत्रात इंजिनीअर म्हणून काम करताना तिने मोटर स्पोर्ट्स, कार रेसिंग यासारखे छंद जोपासले.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : व्यवसायाने पेट्रोलियम इंजिनीअर असलेली कोल्हापुरातील पल्लवी यादव ही सुकन्या हॉलीवूडपटात चमकली आहे. जानेवारीत प्रदर्शित झालेल्या ‘व्हाइट टायगर’ या आंतरराष्ट्रीय सिनेमात तिने अभिनेत्री प्रियंका चोप्रासाठी ‘बॉडी डबल’ म्हणून थरारक स्टंटबाजी केली आहे. पल्लवी श्यामराव यादव हिचे येथील अंबाई डिफेन्स साेसायटी परिसरात बालपण गेले. प्राथमिक शिक्षण होलिक्रॉस कॉन्व्हेन्ट स्कूलमधून आणि महाविद्यालयीन शिक्षण राजाराम कॉलेजमधून पूर्ण केले. नंतर तिने पुण्यातून पेट्रोलियम टेक्नॉलॉजीची पदवी घेतली. पन्हाळा तालुक्यातील उंड्री हे तिच्या वडिलांचे मूळ गाव आहे.
अमेरिका, कतार, दुबई आणि इराक तसेच भारत या ठिकाणच्या पेट्रोलियम क्षेत्रात इंजिनीअर म्हणून काम करताना तिने मोटर स्पोर्ट्स, कार रेसिंग यासारखे छंद जोपासले. येथील आशुतोष काळे यांच्याकडून प्रशिक्षण घेत तिने सुरुवातीला डर्ट बाइक रेसिंग, नंतर ऑटोक्रॉस रेसिंग आणि स्प्रिंट रॅली या प्रकारच्या कार रेसिंगमध्ये भाग घेतला. कोल्हापूरसह बंगळुरू, चंदिगड, जयपूर, भोपाळ अशा राष्ट्रीय शर्यतीतून तिने आपली ही वेगाशी स्पर्धा सुरूच ठेवली.
अडीच आठवडे चित्रीकरण
२०१९ च्या ऑक्टोबरमध्ये अचानक एका हॉलीवूडच्या सिनेमासाठी बॉडी डबल म्हणजे डमीचे काम करण्याची संधी मिळाली.
अरविंद अडिगा यांच्या ‘द व्हाइट टायगर’ या बुकर विजेत्या कादंबरीवर आधारित हॉलीवूडपटात अभिनेत्री प्रियंका चोप्रासाठी डमी म्हणून काही स्टंट दृश्ये साकारली. दिल्लीजवळ एका स्टेडियमवर डिसेंबर २०२० मध्ये अडीच आठवडे याचे चित्रीकरण केले. भारतीय स्टंट दिग्दर्शक सुनील रॉड्रीग्ज यांच्यासोबत हे थरारक स्टंट करण्याची संधीही तिला मिळाली. सिनेमाच्या श्रेयनामावलीतही पल्लवीचे नाव झळकले आहे.
यशासाठी सदैव सज्ज
n डिसेंबर २०२० मध्ये ओवायए या संस्थेच्या गंबाल इंडिया एन्डुरन्स ही ६० तासांच्या आत विनाथांबा कन्याकुमारी ते आग्रा अशी ३००० किलोमीटरची कार शर्यत पूर्ण केली. विशेष म्हणजे दोन्ही पायाने अपंग असलेल्या व्यक्तीचे सहचालक म्हणून तिने या शर्यतीत दुसरे स्थान पटकावले.
n एशियन जिमखाना चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होऊन भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा तिचा मनोदय असून सर्वात कठीण अशा ‘रेन फॉरेस्ट चॅलेंज’सारख्या ‘ऑफ रोड रॅली’त यश मिळविण्याची तिची जिद्द आहे.