कोल्हापूरचे अर्थचक्र सुरू, तीन महिन्यांनी रस्ते बहरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 06:43 PM2021-07-05T18:43:57+5:302021-07-05T18:45:21+5:30
CoronaVirus In Kolhapur : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधाने ठप्प झालेले कोल्हापूर शहराचे अर्थचक्र सोमवारी तीन महिन्यांनंतर प्रथमच व्यापक स्वरूपात सुरू झाले. सर्व व्यवहार, व्यापार, बाजारपेठा पूर्ववत खुल्या झाल्या. प्रचंड आर्थिक संकटात असलेल्या व्यापारी वर्गाला त्यामुळे मोठा दिलासा मिळाला. शहरातील सर्वच व्यवहार नियमितपणे सुरू झाल्याने रस्त्यावर, बाजारपेठातून नागरिकांची तसेच वाहनांची मोठी गर्दी उसळली.
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधाने ठप्प झालेले कोल्हापूर शहराचे अर्थचक्र सोमवारी तीन महिन्यांनंतर प्रथमच व्यापक स्वरूपात सुरू झाले. सर्व व्यवहार, व्यापार, बाजारपेठा पूर्ववत खुल्या झाल्या. प्रचंड आर्थिक संकटात असलेल्या व्यापारी वर्गाला त्यामुळे मोठा दिलासा मिळाला. शहरातील सर्वच व्यवहार नियमितपणे सुरू झाल्याने रस्त्यावर, बाजारपेठातून नागरिकांची तसेच वाहनांची मोठी गर्दी उसळली.
राज्य सरकारच्या सूचनेनुसार तब्बल तीन महिन्यांच्या कालखंडानंतर जिल्हा प्रशासनाने कोल्हापूर शहरातील कोरोनाबाबतचे निर्बंध शिथिल करून सरसकट सर्वच दुकाने, व्यवसाय, व्यापार सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे ह्यपुनश्च हरिओमह्ण करण्यास आसुसलेल्या व्यापारी, व्यावसायिक, छोटे-मोठे दुकानदार, फेरीवाले यांनी आपापल्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन बंद पडलेला व्यवसाय सुरू केला.
शहरातील अनेक दुकानदार सकाळी आठ वाजताच आपापल्या दुकानात पोहचले. तीन महिने बंद असल्यामुळे प्रथम त्यांनी दुकानांची झाडलोट सुरू केली. देव-देवतांच्या फोटोंची पूजा केली आणि बंद पडलेल्या आपल्या व्यवसायाची पुन्हा एकदा सुरवात केली. शहरात केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने कोरोनाच्या काळात सुरू होती. सोमवारपासून मात्र सर्वच दुकाने सुरू झाली. कापड, भांडी, ज्वेलरी, इमिटेशन्स, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, लॉन्ड्री, स्टेशनरी, झेरॉक्स सेंटर, साड्या व ड्रेस मटेरियल, चपल, मोबाईल शॉपी, गॅसशेगडी, पानपट्टी, चहाच्या गाड्या अशा शेकडो प्रकारची दुकाने व व्यवसाय सोमवारी सुरू झाले. त्यामुळे ग्राहकांच्या गर्दीने ही दुकाने फुलून गेली. लहान-मोठे मॉल, शोरूमही सुरू झाले.