कोल्हापूरची वीज मीटर प्रतीक्षा संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:26 AM2021-08-26T04:26:19+5:302021-08-26T04:26:19+5:30

कोल्हापूर : लॉकडाऊन, वीज बिल थकबाकी यांचे आव्हान आणि माेठा आर्थिक ताण सहन करावा लागत असतानाही महावितरणने त्याची कोणतीही ...

Kolhapur's electricity meter wait is over | कोल्हापूरची वीज मीटर प्रतीक्षा संपली

कोल्हापूरची वीज मीटर प्रतीक्षा संपली

Next

कोल्हापूर : लॉकडाऊन, वीज बिल थकबाकी यांचे आव्हान आणि माेठा आर्थिक ताण सहन करावा लागत असतानाही महावितरणने त्याची कोणतीही सावली ग्राहकसेवेवर पडू न देता मागील पाच महिन्यांत २५ हजार ३६३ नव्या जोडण्या देऊन प्रकाश पसरविला आहे. वीजमीटरच्या टंचाईवरदेखील मात करीत तब्बल ६५ हजार मीटर देऊन दीड वर्षापासूनची मीटरची प्रतीक्षा संपविली आहे.

गेल्या दीड वर्षापासून राज्यभर वीज मीटरची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. नवीन वीजजोडण्याही मंदावल्या होत्या. यावरून महावितरणच्या ग्राहकांमध्ये कमालीचा आक्रोश दिसत होता. यावर महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर वीजजोडणी व मीटरजोडणीची कामे युद्धपातळीवर करण्यासाठी यंत्रणा तैनात केली. याचे परिणाम अवघ्या पाचच महिन्यांत दिसून आले असून, तब्बल १५ लाख ७६ हजार वीजजोडण्यांची कामे पूर्ण करून मीटरही उपलब्ध करून देण्यात आले.

कोल्हापुरातही मागील पाच महिन्यांत २५ हजार ३६३ नवीन वीजजोडण्या दिल्या गेल्या. यापूर्वीचा वीजमीटरचा बॅकलॉग जास्त असल्याने जवळपास ६५ हजार जणांना नवे मीटर देऊन त्यांचा वीजवापर अधिकृत करून दिला.

साहित्याच्या उपलब्धतेअभावी जिल्ह्यात नवीन वीजजोडण्याही खोळंबल्या होत्या. आगाऊ रक्कम भरूनदेखील दोन वर्षांपासून जोडणीच मिळत नसल्याने नागरिकही वैतागले होते. कनेक्शन मिळाले तर मीटर मिळत नव्हते. मग परत महावितरणच्या कार्यालयाकडे चकरा मारायची वेळ आली होती. यावरून सातत्याने तक्रारीदेखील होत होत्या. आता सुविधा मिळू लागल्याने ग्राहकांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

चाैकट

दिलेल्या वीजजोडण्या

घरगुती १७ हजार २१८

वाणिज्य ३ हजार १३९

औद्योगिक १ हजार १२

कृषी ३ हजार ३८४

पाणीपुरवठा ९७

पथदिवे १८

इतर ४१५

चौकट

दिलेले वीज मीटर

सिंगल फेज ५७ हजार ८००

थ्री फेज ७ हजार २०६

चौकट

सिंगल फेजचे १५ लाख ६६ हजार, थ्री फेजचे १ लाख १० हजार असे नवीन मीटर राज्यभरात देण्यात आले आहेत.

Web Title: Kolhapur's electricity meter wait is over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.