झाले खासदार.. पुढे आले नाहीत वारसदार; कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' खासदारांनी घराणेशाहीची परंपरा चालवलीच नाही
By पोपट केशव पवार | Published: April 30, 2024 03:09 PM2024-04-30T15:09:31+5:302024-04-30T15:11:42+5:30
पुढची पिढी राजकारण सोडून इतर व्यवसायात
पोपट पवार
कोल्हापूर : साधे ग्रामपंचायतीचे सदस्यपद मिळाले तरी पुढच्या निवडणुकीत आमच्याच घरात हे पद हवे असे सांगत रक्तातील नात्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवून घराणेशाहीची परंपरा अखंडित ठेवणाऱ्यांची संख्या राज्याच्या राजकारणात वाढत आहे. मात्र, कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे कधीकाळी लोकप्रतिनिधी असलेल्या बहुतांश माजी खासदारांनी ही घराणेशाहीची परंपरा मतदारसंघात चालवलीच नाही. त्यामुळे खासदारांच्या घरात खासदार, आमदारच होणार हा समज या माजी खासदारांनी चुकीचा ठरवला आहे.
परिणामी, त्यांच्या पश्चात मतदारसंघात ना घराणेशाही चालविली ना वारसदार पुढे आणले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या माजी खासदारांचा गौरवपूर्ण उल्लेख होताना कोल्हापूरचे पहिले खासदार बाळासाहेब खर्डेकर, सदानंद डिगे यांच्यापासून ते दाजीबा देसाईंपर्यंत अनेकांचे वारसदार नोकरी, व्यवसायातच स्थिरस्थावर झाल्याचे पाहायला मिळते.
निंबाळकरांचे वारस व्यवसायातच
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून १९७१ ला काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झालेल्या राजाराम निंबाळकर यांच्यानंतर त्यांचे वारसदार राजकारणात सक्रिय झाले नाहीत. पूर्वीची राजाराम आणि आताची अयोध्या टॉकीज ही या निंबाळकरांच्या मालकीची. त्यांच्या वारसदारांनी राजकारणाऐवजी व्यवसायालाच अधिक प्राधान्य दिले.
दाजीबांचा मुलगा एकीकरण समितीत
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून १९७७ ला दिल्ली गाठणारे शेकापचे दाजीबा देसाई हे मूळचे बेळगावचे. अखंड महाराष्ट्र असताना त्यांचे गाव चंदगड तालुक्यात होते. देसाई यांचे चिरंजीव दीपक हे सरकारी नोकरदार होते. निवृत्तीनंतर ते महाराष्ट्र एकीकरण समितीत सक्रिय आहेत.
मोरे यांचे कुटुंब राजकारणापासून दूर
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून १९६२ मध्ये के.एल.मोरे हे काँग्रेसकडून संसदेत पोहोचले. दोनवेळा त्यांना ही संधी मिळाली. राजारामपुरीत वास्तव्य असणारे त्यांचे कुटुंब मात्र राजकारणापासून कोसो दूर आहे. त्यांचा मुलगा, मुलगी हे वैद्यकीय क्षेत्रात आहेत.
कदम यांचे वारस पटलावर दिसेनात
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून १९७१ मध्ये गुलाल लागलेले दत्तात्रय बाबूराव कदम हे मूळचे शिरदवाडचे (ता. शिरोळ) रहिवासी. दत्तुबा या नावाने ते लाेकप्रिय होते. त्यांच्या पश्चात त्यांचे कुटुंब राजकारणात आले नाही. मात्र, अलीकडच्या काळात त्यांचे नातू इचलकरंजी नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते.