कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगाची गती वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:10 AM2021-02-05T07:10:59+5:302021-02-05T07:10:59+5:30
कोल्हापूर : तांबे, स्टीलसह अन्य मेटल्सवरील आयात शुल्क कमी झाल्याने आणि १५ वर्षांपूर्वीच्या वाहनांच्या स्क्रॅपिंग पॉलिसीबाबत सोमवारी सादर झालेल्या ...
कोल्हापूर : तांबे, स्टीलसह अन्य मेटल्सवरील आयात शुल्क कमी झाल्याने आणि १५ वर्षांपूर्वीच्या वाहनांच्या स्क्रॅपिंग पॉलिसीबाबत सोमवारी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे फौंड्री हब असलेल्या कोल्हापूरमधील उद्योगांची गती वाढण्यास मदत होणार आहे. परदेशातून येणाऱ्या वाहनांच्या सुट्या भागांवरील आयात शुल्क वाढवल्याने आपल्या देशात या सुट्या भागांच्या निर्मितीला आणखी चालना मिळणार आहे.
प्रतिक्रिया
कोरोनाच्या धक्क्यातून कोल्हापुरातील फौंड्रीसह अन्य उद्योग-व्यवसाय उभा राहात आहेत. गेल्या चार महिन्यांपासून फौंड्री उद्योगाची गती थोडी वाढली आहे. या उद्योगांसाठी कच्चा माल म्हणून लागणाऱ्या काही मेटल्सचे वाढलेले दर अडचणीचे ठरत होते. या बजेटमध्ये त्यावरील आयात शुल्क कमी केल्याने उत्पादन खर्चात बचत होणार आहे. वाहनांच्या स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे वाहनांची मागणी वाढणार आहे. वाहनांच्या सुट्या भागांवर आयात शुल्क वाढविल्याने याचा फायदा फौंड्री उद्योगाला होणार असून, उद्योग-व्यवसायात भरारी घेण्याच्या दृष्टीने उद्योजकांची आशा पल्लवित झाली आहे.
- सुमित चौगले, अध्यक्ष, इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फौंड्रीमेन, कोल्हापूर
प्रतिक्रिया
कॉपर, स्टील्स, आदी मेटल्सवरील आयात शुल्क कमी केल्याचा फायदा कोल्हापूरमधील उद्योगांना होणार आहे. १५ वर्षे पूर्ण केलेल्या दुचाकी, चारचाकी स्क्रॅप केल्याने सुमारे एक कोटी नव्या वाहनांची मागणी होणार आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी सुट्टे भाग पुरवणाऱ्या जिल्ह्यातील विविध उद्योगांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. देशात सात ठिकाणी टेक्सटाईल्स पार्क होणार असून, त्याचा इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाला फायदा होईल.
- नरेंद्र माटे, संचालक, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स