टोकियो ऑलिम्पिकसाठी नेमबाजी संघात कोल्हापूरचे चौघे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:23 AM2021-04-07T04:23:34+5:302021-04-07T04:23:34+5:30

(चौघांचेही फाईल फोटो वापरावेत) लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : टोकियो ऑलिम्पिकसाठीच्या नेमबाजी संघात कोल्हापूरच्या सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत, राही सरनोबत ...

Kolhapur's four in the shooting squad for the Tokyo Olympics | टोकियो ऑलिम्पिकसाठी नेमबाजी संघात कोल्हापूरचे चौघे

टोकियो ऑलिम्पिकसाठी नेमबाजी संघात कोल्हापूरचे चौघे

Next

(चौघांचेही फाईल फोटो वापरावेत)

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : टोकियो ऑलिम्पिकसाठीच्या नेमबाजी संघात कोल्हापूरच्या सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत, राही सरनोबत यांची मुख्य संघात, तर अभिज्ञा अशोक पाटील, स्वप्निल कुसाळे यांची भारतीय संघात निवड झाली. कोल्हापूरच्या नेमबाजी इतिहासातील हा सुवर्णक्षण आहे.

या निवडी दिल्लीत झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील कामगिरीवर झाल्या. एकाच जिल्ह्यातील तब्बल चार खेळाडूंची ऑलिम्पिकच्या संघात देशाकडून निवड व्हावी, असे देशाच्या इतिहासातही बहुधा प्रथमच घडले असावे.

तेजस्विनीने कोल्हापूरच्या दुधाळी शूटिंग रेंजवर नेमबाजीचे धडे गुरू जयसिंग कुसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केले. २००४ साली इस्लामाबाद येथे झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण, त्यानंतर २००६ मध्ये ऑस्ट्रेलियातील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण, २००९ साली म्युनिच विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर थ्री पोझिशन मध्ये कांस्य, २०१० च्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत विजेतेपद आणि विक्रमाची बरोबरी साधली. त्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या. नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजीत तिने सुवर्णपदकाची कमाई केली. या सर्व कामगिरीवर ती यापूर्वीच टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली. तिच्या निवडीवर नॅशनल रायफल असोसिएशनने शिक्कामोर्तब केला.

कोल्हापूरची दुसरी नेमबाज राही सरनोबत हिनेही २००८ मध्ये राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळविले. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. तिनेही २५ मीटर पिस्तूल प्रकारात ही कामगिरी केली. २०१८ मध्ये जाकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकाविले. त्यानंतर विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला ठरली. चॅगवान येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतही तिने २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. यापूर्वीच तिनेही ऑलिम्पिक कोटा पूर्ण करीत स्पर्धेचे तिकीट मिळवले. त्यावर दिल्लीत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत एक रौप्य व सांघिक प्रकारात सुवर्ण कामगिरी करीत तिने मोहोर उठविली.

या दोघींनंतर पेठवडगाव (ता. हातकणंगले )ची, पण सध्या नाशिक क्रीडा प्रबोधिनीची खेळाडू असलेल्या अभिज्ञा पाटील हिनेही २५ मीटर स्पोर्टस्‌ पिस्तूल प्रकारात विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. तिने या प्रकारात राहीपेक्षा सरस कामगिरी केली. मात्र ती संघात नसल्यामुळे तिला केवळ कामगिरी सुधारणेकरिता स्पर्धेत सहभाग घेता आला. त्यात तिने अव्वल कामगिरी केली. या कामगिरीबरोबर तिच्या यापूर्वीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीचा विचार करून तिचा भारतीय ऑलिम्पिक पथकात राखीव खेळाडू म्हणून समावेश झाला आहे.

कोल्हापूरचा, पण सध्या रेल्वेत नोकरीस असलेला स्वप्निल कुसाळे हा भारतीय संघातून ५० रायफल थ्री पोझिशनमध्ये राखीव म्हणून भारतीय पथकात निवडला आहे. त्यानेही दिल्लीतील विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेतला.

कोट

आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामगिरीची दखल घेत नॅशनल रायफल असोसिएशनने दिलेल्या संधीचे सोने झाले आहे. मुख्य संघात नसलो तरी, ऑलिम्पिककरिता राखीव निवड होणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणखी चांगली कामगिरी करून पुढील ऑलिम्पिकला मुख्य स्पर्धेत मुख्य संघात स्थान घेईन.

- स्वप्निल कुसाळे,

आंतरराष्ट्रीय नेमबाज

प्रतिक्रिया...

भारतीय संघात निवड अपेक्षित होती. देशासाठी ऑलिम्पिकमधील पदक राही सरनोबत नक्कीच जिंकेल, असा आम्हा कुटुंबियांना विश्वास आहे.

- आदित्य सरनोबत

( राही सरनोबतचा भाऊ )

प्रतिक्रिया...

तिची निवड होणे अपेक्षित होते. सध्याची तिची तयारी पाहता, ती निश्चितच भारतासाठी पदक जिंकेल.

- सुनीता सावंत,

तेजस्विनी सावंतची आई

Web Title: Kolhapur's four in the shooting squad for the Tokyo Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.