कोल्हापूरचा गो‘सेवक’ अवधूत सोळंकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:32 AM2017-10-16T00:32:51+5:302017-10-16T00:32:57+5:30
वसू बारस विशेष
भरत बुटाले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘इच्छा तेथे भाव आणि मनी तेथे देव’ या म्हणीची प्रचिती देणारे अवलिया अवधूत सोळंकी. दररोज ५० वर गार्इंच्या उदरभरणाचा वसाच या सेवकाने घेतला आहे. गेली दोन वर्षे त्यांचा हा उपक्रम अखंडितपणे सुरू आहे. आज ‘वसू बारस’च्या निमित्ताने त्यांच्या कार्याविषयी घेतलेला आढावा.
बीएचएमएस असलेले ३७ वर्षीय अवधूत सोळंकी येथील सागरमाळ परिसरात कुटुंबासह राहतात. या कुटुंबीयांची सकाळ इतरांपेक्षा जरा वेगळीच आहे. सकाळी साडेसहा वाजले की त्यांच्या दारात परिसरातील गाई येण्यास सुरुवात होते. त्याचवेळी अवधूत यांचे काम सुरू होते. प्रथम ते घरात ठेवलेल्या पोत्यातील भुस्सा प्लास्टिकच्या बुट्ट्यांमध्ये काढतात. एक एक करीत तब्बल २२ बुट्ट्या भरल्या जातात. त्या दारात आणूपर्यंत गो‘कुळा’चा गोतावळ्याने अंगण भरून जाते. प्रत्येकीसमोर ते खाद्याची बुट्टी ठेवतात. ‘हरे कृष्ण.. हरे कृष्ण’चा जप करीतच ते गाई-वासरांच्या पाठीवर, मुखावर वात्सल्याचा हात फिरवत गोतावळ्यात रमून जातात. प्रत्येक गाईला व्यवस्थित खाद्य मिळते का, यावरही त्यांची नजर असते. तोपर्यंत त्यांच्या पत्नी लक्ष्मी या दारातील दोन-तीन कुंड्यांमध्ये गार्इंसाठी पाण्याची व्यवस्था करतात.
सकाळी साडेसहा ते साधारण दहा-अकरापर्यंत तरी हे कार्य सुरू असते. त्या काळात जितक्या गाई येतील त्यांना खाद्य मिळतेच. गार्इंनाही आपण इथून उपाशी जाणार नाही, अशी हमीच वाटावी इतकी काळजी अवधूत घेतात. त्यानंतर सुरू होते त्यांच्या मुलांचे काम. एकत्र आलेल्या गार्इंमध्ये झुंजी लागतात. त्यामुळे लगेचच मुलगा विपुल आणि मुलगी विनिता या गोतावळ्याला हुसकावून लावतात.
त्याही जणू नियमाचे पालन केल्यासारख्या तेथून निघून जातात. एवढ्यावरच हे काम थांबत नाही. दारात तसेच रस्त्यावर पडलेली शेण-घाण अवधूत यांच्या आई जमुना एका महिलेच्या मदतीने खराट्याने काढून टाकतात. एकही दिवस गार्इंना खाद्य चुकू नये म्हणून अवधूत सोळंकी कोल्हापूर सोडून कुठेही वस्तीला रहात नाहीत. निष्काम कर्मयोगाचं हे काम अगदी मनापासून आणि आनंदानं सुरू असतं, ते तिथला एकूणच सेवेचा उपक्रम पाहून नक्कीच अनुभवास येतं.
रुग्णांना ‘गीता-
माधुर्य’चे वाटप
गो‘सेवे’च्या वृतामुळे अवधूत केवळ सायंकाळीच रुग्णांची तपासणी करतात. एखाद्या रुग्णाने स्वत: तणावग्रस्त असल्याचे सांगितले, तर त्याला ते ‘गीता-माधुर्य’ पुस्तक देऊन ते वाचण्यास सांगतात. ते वाचल्यानंतर रुग्णाकडूनच सकारात्मक फरक पडल्याचे ते सांगतात.
अशीही काळजी
एक दिवस या गोतावळ्यातील वासरू ढकलाढकलीत गटारीत पडून जखमी झाले. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून अवधूत यांनी स्वखर्चाने तेथील गटारीवर सिमेंटचे ब्लॉक बसविले. त्यामुळे गार्इंना तेथे थांबणे आणि फिरणेही सोयीस्कर झाले.
वडील, आत्या सेवाभावी
अवधूत यांचे वडील विजय सोळंकी डॉक्टर असल्यामुळे त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेत अनेक गरीब रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत. त्यांच्या आत्यांनीही अनेक कुत्रे, मांजरांचा अगदी लहान मुलांसारखा सांभाळ केला आहे.
बासरी, मृदंग, गिटारचा छंद
अवधूत यांना बासरी, मृदंग आणि गिटार वाजविण्याचा छंद आहे. यातून वेळ काढून या वाद्यांचा ते मनमुराद आनंद लुटतात.