कोल्हापूरचे आयकर निरीक्षक पत्नीसह अपघातात ठार
By admin | Published: February 21, 2016 01:15 AM2016-02-21T01:15:40+5:302016-02-21T01:24:20+5:30
राजापूर तालुक्यात घटना : लग्नाच्या वाढदिनी काळाचा घाला
राजापूर : लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दुचाकीवरून फिरण्यासाठी आलेल्या दाम्पत्याचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. राजापूर तालुक्यात वाटूळनजीक टेम्पोवर बुलेट आदळून हा अपघात झाला. अपघातात मृत झालेले राकेशकुमार मीना (वय २६, रा. मूळ राजस्थान) कोल्हापूर येथे आयकर विभागात निरीक्षक पदावर काम करीत होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अर्जुन कफेरकीर (वय ३५, हणकणे, गोवा) हा आयशर टेम्पो (जीए ०४ टी ४५८४) घेऊन गोव्याहून मुंबईकडे चालला होता. त्याचवेळी राकेशकुमार मीना पत्नी आशाकुमारी यांच्यासह बुलेटवरून (एमएच ०९ डीजी ४२२४) निघाले होते. मुंबई-गोवा महामार्गावर वाटुळनजीक टेम्पोला ओव्हरटेक करताना राकेशकुमार यांची बुलेट टेम्पोवर आदळली. धडक एवढी जोरात होती की, हेल्मेट घालूनही राकेशकुमार यांच्या डोक्याला जबर मार लागला. यात मागे बसलेल्या आशाकुमारी या जागीच ठार झाल्या.
राकेशकुमार यांना जबर मार लागल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. राजापूर पोलिसांनी टेम्पो चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)