कोल्हापूरचा महापुराचा विळखा सैल, राष्ट्रीय महामार्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:26 AM2021-07-27T04:26:14+5:302021-07-27T04:26:14+5:30

कोल्हापूर : पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याने सोमवारी पाणी वेगाने उतरू लागल्याने कोल्हापुरातील महापुराचा विळखाही सैल झाला. राष्ट्रीय महामार्गही वाहतुकीसाठी ...

Kolhapur's Mahapura Vilkha Sail, National Highway started | कोल्हापूरचा महापुराचा विळखा सैल, राष्ट्रीय महामार्ग सुरू

कोल्हापूरचा महापुराचा विळखा सैल, राष्ट्रीय महामार्ग सुरू

Next

कोल्हापूर : पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याने सोमवारी पाणी वेगाने उतरू लागल्याने कोल्हापुरातील महापुराचा विळखाही सैल झाला. राष्ट्रीय महामार्गही वाहतुकीसाठी खुला झाला असून सर्व प्रकारची वाहतूक सुरू झाली आहे. रविवारी संध्याकाळी उघडलेले राधानगरी धरणाचे पाचपैकी चार स्वयंचलित दरवाजे बंद झाल्याने विसर्ग कमी झाला आहे. पाऊस थांबून कडक ऊन पडल्याने मदतकार्य वेगावले असून पूर ओसरेल तसा घराघरांत, दुकानात स्वच्छतेची कामेही युद्धपातळीवर सुरू आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अजूनही पूरग्रस्त भागात एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू आहे. पाऊस आणि पूर ओसरल्याने ठप्प झालेले जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले असून भाजीपाला, गॅस, पेट्रोलची टंचाई दूर झाली आहे. आज मंगळवारपासून शहरातील पाणीपुरवठा देखील सुरळीत होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला गुरुवारपासून महापुराचा पडलेला विळखा पाऊस कमी झाल्याने रविवारपासूनच सैल होऊ लागला होता, पण रविवारी संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत जोरदार पाऊस सुरू झाल्याने राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडल्याने भोगावती नदी पात्रातून पंचगंगा खोऱ्यात ८ हजार क्युसेकने विसर्ग सुरू झाल्याने पुन्हा महापुराची धास्ती वाढली होती, पण सोमवारी दिवसभर पाऊस पूर्णपणे उघडल्याने आणि कडकडीत ऊन पडल्याने नद्यांचे पाणी झपाट्याने ओसरु लागले. पाऊस थांबल्याने दुपारी एक ते दोन या तासाभरात काल उघडलेले राधानगरीचे पाचपैकी चारही दरवाजे बंद झाल्याने विसर्ग केवळ २८०० क्युसेकवर आला आहे. विसर्ग कमी झाल्याने पंचगंगेची पाणीपातळी देखील तासाला दोन इंच या प्रमाणे कमी होत ती संध्याकाळपर्यंत ४७ फुटापर्यंत खाली आली आहे. तरीदेखील ती ४३ फूट या धोक्याच्या पातळीवरूनच वाहत असल्याने अजून एकूण पूर बाधितांपैकी निम्मे लोक अजूनही पुरातच अडकलेले आहेत.

दरम्यान, सोमवारी दिवसभर कडकडीत ऊन पडल्याने जनजीवन बऱ्यापैकी पूर्वपदावर आले असून बाजारपेठेतही खरेदीसाठी गर्दी उसळली. शहरातील प्रमुख रस्तेही माणसांच्या गर्दीने फुलले आहेत. महामार्ग बंद असल्याने पेट्रोल, गॅसची टंचाई मोठ्याप्रमाणावर जाणवत होती. सोमवारी दुपारी महामार्ग सुरू झाल्यानंतर हा पुरवठा सुरळीत झाला.

महामार्गावरून वाहतूक सुरू

महापुराचे पाणी रस्त्यावर आल्याने शिरोली, किणी, कागल आयबीपी येथे महामार्ग बंद झाला हाेता. सोमवारी दुपारी बारानंतर या तीनही ठिकाणचे पाणी पूर्णपणे ओसरल्याचे पाहून पोलिसांमार्फत पाहणी झाल्यानंतर महामार्गावरून वाहतूक सुरू केली. यामुळे गेल्या चार दिवसांपासून खोळंबलेली महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. कोल्हापूर ते पुणे, कोल्हापूर ते बेळगाव वाहतूक सुरू झाली.

पेट्रोल सुरू..पाणीपुरवठा आजपासून शक्य

महापुरात पिण्याचे पाणी व पेट्रोलसाठी लोकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. महामार्ग बंद राहिल्याने इंधन टँकर शहरात न आल्याने इंधनाची टंचाई होती. महामार्ग सुरू झाल्याने ती दूर झाली. महापालिका जलशुद्धिकरण केंद्राचे वीज पंप पाण्यात बुडाल्याने शहर पाणीपुरवठा खंडित झाला होता तो आजपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

राधानगरीचा एकच दरवाजा खुला

जिल्ह्यातील राधानगरी धरण ९९ टक्के भरले आहे. चार दरवाजे बंद असून विद्युत विमोचकातून १४००, सिंचन विमोचकातून १४२८ असा एकूण २८२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचा पाच क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा अजून खुला आहे.

प्रमुख बंधाऱ्यावरील पाणीपातळी

राजाराम ४७ फूट, सुर्वे ४५ फूट, रुई ७७ फूट, इचलकरंजी ७५, तेरवाड ७४ फूट, शिरोळ ७४ फूट, तर नृसिंहवाडी बंधाऱ्याची ७४ फूट

७४ बंधारे पारण्याखाली

पंचगंगा नदी- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगाव.

तुळशी नदी- बीड व आरे, कासारी नदी- यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपण, बाजार -भोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेण व वालोली.

कुंभी नदी- शेणवडे, कळे, वेतवडे व मांडुकली. धामणी नदी- पनोरे, सुळे व आंबर्डे, वारणा नदी- चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगांव, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, चावरे, खोची व दानोळी.

कडवी नदी- वाळूर, भोसलेवाडी, येलूर, कोपार्डे, शिगांव, सवते सावर्डे व सरुडपाटणे.

दूधगंगा नदी- सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी, दत्तवाड, सुळंबी, व कसबा वाळवे.

वेदगंगा नदी- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली.

हिरण्यकेशी नदी- ऐनापूर, निलजी, गिजवणे, खाणदळ, जरळी व हरळी.

घटप्रभा नदी- कानडे सावर्डे, हिंडगाव, तारेवाडी, अडकूर व कानडेवाडी,

ताम्रपर्णी नदी- कोवाड, चंदगड, कुर्तनवाडी, हल्लारवाडी व माणगाव,

जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा (दशलक्ष घनमीटरमध्ये)

तुळशी - ९४.४७

वारणा -८८६.२४

दूधगंगा -५९०.७७

कासारी- ६३.५१

कडवी - ७१.२४

कुंभी - ६८.६०

पाटगाव- ९४.९३

चिकोत्रा-४०.०९

चित्री - ५३.४१

आंबेआहोळ - ३०.९८

Web Title: Kolhapur's Mahapura Vilkha Sail, National Highway started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.