कोल्हापूरच्या माऊली जमदाडेकडून कर्नाटकमध्ये पंजाबचा मल्ल चितपट, पटकावला महान भारत केसरी किताब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 03:22 PM2017-12-04T15:22:16+5:302017-12-04T15:29:14+5:30
कोल्हापूरच्या माऊली जमदाडे या पैलवानानं कर्नाटक राज्यात कुस्ती जिंकली. पंजाबचा मल्ल अमित सरोहा याला घिस्सा डावावर चितपट करुन माऊलीनं महान भारत केसरी किताब पटकावला आहे. बेळगाव जिल्ह्यातल्या जमखंडीमध्ये माऊली जमदाडे या पैलवानानं विजयी पताका फडकावली आहे.
बेळगाव : कोल्हापूरच्या माऊली जमदाडे या पैलवानानं कर्नाटक राज्यात कुस्ती जिंकली. पंजाबचा मल्ल अमित सरोहा याला घिस्सा डावावर चितपट करुन माऊलीनं महान भारत केसरी किताब पटकावला आहे. माऊली याला २ लाख रुपयांचं पारितोषिक आणि चांदीची गदा प्रदान करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्ह्यातल्या जमखंडीमध्ये माऊली जमदाडे या पैलवानानं विजयी पताका फडकावली आहे. बेळगाव जिल्ह्यातल्या जमखंडीमध्ये महान भारत केसरी स्पर्धा पार पडली. त्यामध्ये कोल्हापूरच्या गंगावेश तालमीच्या माऊली जमदाडे यानं महान भारत केसरीचा किताब पटकावला.
भारतीय कुस्ती संघाच्या वतीनं जमखंडीमध्ये ही कुस्तीची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी देशभरातले नामांकित मल्लही आले होते. त्यात पंजाब राज्याचा मल्ल अमित सरोहा याला घिस्सा डावावर चितपट करुन कोल्हापूरच्या माऊलीनं कुस्ती जिंकली.
विजेता माऊली याला २ लाख रुपयांचं पारितोषिक आणि चांदीची गदा प्रदान करण्यात आली आहे. या कुस्तीनंतर गंगावेश तालमीच्या सगळ्याच पैलवानांनी माऊली याचं जोरदार स्वागत केलं.
विशेष म्हणजे गेल्या वर्षीही जमखंडीच्या मैदानावर महान भारत केसरीचा मान हा याच गंगावेश तालमीच्या योगेश बोंबाळे यानं मिळवला होता. त्यानंतर यंदाही कोल्हापूरच्या या पैलनानानं कर्नाटक राज्यात आपल्या कुस्तीचं प्रदर्शन करत तिथलं मैदान मारलं.