कोल्हापूरची ‘एमएच-०९’ दिल्ली गाजवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 05:32 PM2017-10-05T17:32:03+5:302017-10-05T17:34:37+5:30
कोल्हापूर व महाराष्ट्राचा एकमेव युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव हा आज, नवी दिल्लीत आज, शुक्रवारपासून होणाºया १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील उद्घाटनाचा पहिला सामना युएसए अर्थात अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. त्याच्या जर्सीचा क्रमांक ओघाने नऊ दिला आहे. त्यामुळे कोल्हापूरची जणू ‘एमएच-०९ ’ दिल्ली गाजविणार आहे. विशेष म्हणजे तो स्ट्रायकर म्हणून संघात पूर्णवेळ खेळणार आहे.
सचिन भोसले
कोल्हापूर : कोल्हापूर व महाराष्ट्राचा एकमेव युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव हा आज, नवी दिल्लीत आज, शुक्रवारपासून होणाºया १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील उद्घाटनाचा पहिला सामना युएसए अर्थात अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. त्याच्या जर्सीचा क्रमांक ओघाने नऊ दिला आहे. त्यामुळे कोल्हापूरची जणू ‘एमएच-०९ ’ दिल्ली गाजविणार आहे. विशेष म्हणजे तो स्ट्रायकर म्हणून संघात पूर्णवेळ खेळणार आहे.
भारतात आजपासून होणाºया १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येतून केवळ एकमेव अनिकेत अनिल जाधव खेळणार आहे. त्याची वर्णी अकराच्या संघात लागली आहे. अनिकेतच्या रूपाने कोल्हापुरातील ‘फुटबॉलच्या पंढरी’चा व मातृसंस्था असलेल्या के.एस.ए.चाही गौरव यानिमित्त होणार आहे. सामन्यात अनिकेत खेळणार असल्याने तो क्षण ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी कोल्हापुरातून त्याचे वडील अनिल, आई कार्तिकी, बहीण काजोल आणि मामा संजय जाधव आदी दिल्लीला गेले आहेत.
हा महत्त्वपूर्ण क्षण डोळ्यांत साठविण्यासाठी त्याचे आई वडील व त्यांच्यासह त्याला सातत्याने आर्थिक व मानसिक पाठबळ देणारे ‘विफा’चे उपाध्यक्ष माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे, माजी फुटबॉलपटू विकास पाटील व त्याचे अगदी दहा वर्षांपासून त्याला फुटबॉलचे प्राथमिक धडे देणारे प्रशिक्षक जयदीप अंगीरवाल हेही दिल्लीला हा सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत.
एकेकाळी घरी दंगामस्ती करतो व फुटबॉल खेळाची आवड म्हणून आई कार्तिकी यांनी त्यांचे भाऊ संजय जाधव यांच्याकडे पाठवून दिले. त्यांनी त्याच्यातील कौशल्य पाहून सांगलीला क्रीडा प्रबोधिनीमध्ये त्याला दाखल केले. फुटबॉलमधील कौशल्य पाहून अनिकेतला पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनीत स्थलांतरित करण्यात आले.त्याच्यातील कौशल्य व अंगकाठी पाहून तेथील क्रीडा मार्गदर्शक व राष्ट्रीय फुटबॉलपटू जयदीप अंगीरवाल यांनी त्याच्यावर अपार मेहनत घेतली आणि हा हिरा घडविला.
अनिकेत बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनीमध्ये असतानाच त्याच्यातील कौशल्य पाहून अंगीरवाल यांनी त्याला १९ वर्षांखालील पुणे एफसी संघाकडून खेळविले. मजल दरमजल करत अनिकेतने युरोप खंडातील अनेक देशांसह एकूण २५ देशांचे दौरे करत त्याने एकूण ४५ गोल नोंदवले आहेत. त्याच्या अष्टपैलू खेळीची दखल घेत भारतीय फुटबॉल महासंघाने त्याच्यावर दोन वर्षांत लाखो रुपये खर्च करत खेळात अचूकता आणली.
महाराष्ट्रातून दोघांची निवड झाली. त्यातील नमित देशपांडे हा मुंबईतून निवडण्यात आला आहे परंतु तो मूळचा अनिवासी भारतीय आहे. त्याचे आई-वडील हे अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून केवळ अनिकेतची निवड झाली आहे. भारतीय संघात केवळ दोन स्ट्रायकर आहेत. त्यापैकी अनिकेत हा एक आहे, तर दुसरा मणिपूरचा रहिम अली हा आहे.
अनिकेतच्या खेळातील कसब, शैली आणि कुठल्याही पोझिशनला चमक दाखविण्याची तयारी यामुळे तो भारतीय संघाचे पोर्तुगीज प्रशिक्षक लईस नॉर्थन डी मॅथ्योस यांच्या गळ्यातील तो ताईत बनला आहे. आज, भारतीय संघ प्रथमच फिफा १७ वर्षांखालील विश्वचषकात खेळणार आहे. त्याच्या अष्टपैलू खेळीची उत्सुकता करवीरनगरीतील तमाम फुटबॉल शौकीनांना लागून राहिली आहे. ही उत्सुकता सायंकाळनंतर शिगेला पोहोचणार आहे. कारण रात्री आठ वाजता पहिली लढत बलाढ्य यु.एस.ए. अर्थात अमेरिकेशी आहे.
‘याची देही याची डोळा’ हा क्षण साठविण्यासाठी मी व माझी पत्नी कार्तिकी, मुलगी काजोल व माझे मेहुणे संजय जाधव असे सर्वजण अनिकेतच्या पहिल्या-वहिल्या विश्वचषक स्पर्धेतील खेळीचे साक्षीदार होणार आहे. हा क्षण आमच्या जीवनातील दुर्मीळ असणार आहे. माझ्यासारख्या रिक्षाचालकाचे स्वप्न अनिकेत पूर्णत्वास नेत आहे. ही बाब माझ्यासह कुटुंबाला भूषणावह आहे. त्याच्या यशात कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे कृपाछत्र आहे.
- अनिल जाधव,
अनिकेतचे वडील