कोल्हापूरचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 04:02 PM2020-09-03T16:02:13+5:302020-09-03T16:15:55+5:30
कोल्हापूर परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून मनोजकुमार एस. लोहिया यांची बदली करण्यात आली आहे. नांदेड परिक्षेत्रातून त्यांची येथे बदली झाली आहे; तर डॉ. सुहास वारके यांची कायदा व सुव्यवस्था पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे बदली झाली.
कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून मनोजकुमार एस. लोहिया यांची बदली करण्यात आली आहे. नांदेड परिक्षेत्रातून त्यांची येथे बदली झाली आहे; तर डॉ. सुहास वारके यांची कायदा व सुव्यवस्था पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे बदली झाली.
भारतीय पोलीस सेवेतील महानिरीक्षक श्रेणीतील दर्जाच्या आधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश बुधवारी राज्याच्या गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी काढले. त्यानुसार या बदल्यांचे आदेश निघाले.
कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर डॉ. वारके यांनी गेले वर्षभर काम पाहिले आहे. आता त्यांच्या जागी बदली झालेले मनोजकुमार लोहिया हे मूळचे नांदेडचे असून यापूर्वी त्यांनी मुंबईत अतिरिक्त आयुक्तपदाची, तर पोलीस अधीक्षक मंडळावर मुख्य दक्षता अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच त्यांनी पुणे ग्रामीण, परभणी, औरंगाबाद येथेही पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे.
याशिवाय दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्य केलेले विश्वास नांगरे-पाटील यांची नाशिकहून मुंबईत आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेच्या सहआयुक्तपदावर बदली झाली. तसेच यापूर्वी कोल्हापुरात पोलीस अधीक्षकपदावर काम केलेले यशस्वी यादव यांची मुंबई शहर वाहतूक पोलीस आयुक्तालय येथे सहपोलीस आयुक्तपदी बदली झाली.
कोल्हापूर जिल्ह्यात यापूर्वी सेवा बजावलेले प्रताप दिघावकर यांची नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी, तर मिलिंद भारंबे यांची मुंबई शहर पोलीस आयुक्तालयात गुन्हे विभागाच्या सहपोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे.