कोल्हापूरचे पासपोर्ट कार्यालय मंगळवारपासून पुन्हा सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 08:04 PM2020-11-28T20:04:54+5:302020-11-28T20:16:22+5:30
coronavirusunlock, passportoffice, sanjaymandlik, kolhapurnews कोरोनामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेले कोल्हापुरातील पासपोर्ट कार्यालय मंगळवार (१ डिसेंबर) पासून पुन्हा एकदा कोल्हापूरकरांच्या सेवेत दाखल होत आहे. त्यामुळे तब्बल सात महिन्यांनंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पुण्याला जाण्याचे हेलपाटेही वाचले आहेत.
कोल्हापूर : कोरोनामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेले कोल्हापुरातील पासपोर्ट कार्यालय मंगळवार (१ डिसेंबर) पासून पुन्हा एकदा कोल्हापूरकरांच्या सेवेत दाखल होत आहे. त्यामुळे तब्बल सात महिन्यांनंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पुण्याला जाण्याचे हेलपाटेही वाचले आहेत.
शिक्षण, नोकरी, व्यवसाय, उपचार, सहल, नातेवाइकांची भेट, आदी कारणांसाठी कोल्हापुरातून परदेशांत जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यासाठी पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्याही जास्त आहे; पण कोल्हापुरात कार्यालय नसल्याने पुण्याला जाऊन पासपोर्ट काढावा लागत होता. कोल्हापुरातील वाढती संख्या लक्षात घेऊन ज्ञानेश्वर मुळे आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नांतून कसबा बावड्यातील पोस्टाच्या कार्यालयातच २०१४ साली पासपोर्ट कार्यालय सुरू झाले.
या कार्यालयातून रोज २०० जणांना अपाइंटमेंट दिली जात होती. दरमहा २० ते २५ हजार पासपोर्ट निघत होते. मार्चमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन करावा लागला आणि हे कार्यालयच बंद झाले. तेव्हापासून आजतागायत ते बंदच असल्याने तातडीने पासपोर्ट हवा असल्यास पुण्यातील कार्यालयाकडे जावे लागत होते. अन्लॉकच्या दुसऱ्या टप्प्यात पर्यटनाला परवानगी दिल्याने पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.
पुण्यातील कार्यालयही सुरू झाले. त्यामुळे कोल्हापुरातून ही सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी सातत्याने होत होती. शुक्रवारीच (दि. २७) संजय घाटगे यांनी खासदार संजय मंडलिक यांची भेट घेऊन यात लक्ष घालण्याची विनंतीही केली होती. कोल्हापुरातून झालेल्या पाठपुराव्यामुळे अखेर हे कार्यालय पुन्हा सुरू होत आहे.