कोल्हापूरची रंगभूमी पुन्हा बहरेल : संजय मोहिते

By admin | Published: March 25, 2015 09:13 PM2015-03-25T21:13:03+5:302015-03-26T00:28:43+5:30

‘अपना सपना फनी, फनी’ हे नाटक. धम्माल विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणाऱ्या या नाटकाचा ‘जागतिक रंगभूमी दिनी’ -थेट संवाद...

Kolhapur's play will revive: Sanjay Mohite | कोल्हापूरची रंगभूमी पुन्हा बहरेल : संजय मोहिते

कोल्हापूरची रंगभूमी पुन्हा बहरेल : संजय मोहिते

Next

कोल्हापुरातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला मरगळ आलेली असताना कोल्हापुरातील जे काही होतकरू कलाकार व संस्था या क्षेत्रात यशस्वीरित्या धडपडत होते, त्यातील एक नाव म्हणजे संजय मोहिते. ‘फिनिक्स क्रिएशन’ या संस्थेद्वारे ‘सोकाजीराव टांगमारे’सारख्या विनोदी व्यावसायिक नाटकापासून ते राज्य नाट्यमधील ‘मीटर डाऊन आॅफ बीट’ नाटकानंतर संजय घेऊन येत आहे ‘अपना सपना फनी, फनी’ हे नाटक. धम्माल विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणाऱ्या या नाटकाचा ‘जागतिक रंगभूमी दिनी’ म्हणजे शुक्रवारी प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला थेट संवाद...

प्रश्न : अभिनय क्षेत्रात तुझ्या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली?
उत्तर : माझं गाव आरे. या गावाला धार्मिक, सांस्कृतिक वारसा आहे. माझे आजोबा सोंगी भजनाचे कार्यक्रम करायचे. त्यामुळे मीदेखील ते करू लागलो. ते बंद झाल्यानंतर रेकॉर्ड डान्स स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ लागलो. पण शाळा, महाविद्यालयांत गॅदरिंगवर बंदी आल्याने तेही थांबले. मला याच क्षेत्रात काही तरी करायचे होते. एका डान्स स्पर्धेला पौर्णिमा खटावकर आणि प्रकाश हिलगे हे परीक्षक होते, त्यांनी माझा डान्स पाहिला आणि आॅर्केस्ट्राची आॅफर दिली. मलाही ते हवेच होते. नऊ वर्षे मी आॅर्केस्ट्रामध्ये असल्याने नृत्य, वाद्ये, निवेदन, अभिनय असे कलेचे सगळे प्रकार हाताळले. आॅर्केस्ट्रापुरते विश्व मर्यादित राहू नये, यासाठी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागाची चाचपणी करू लागलो. काळम्मावाडीच्या हनुमान नाट्य तरुण मंडळाचे ‘निष्पाप’ हे माझे पहिले नाटक. त्यानंतर ‘इच्छा माझी पुरी करा’, ‘धरणाखालच्या अंधारातून’, ‘कथा नामा जोग्याची’, ‘कन्यादान’, ‘जोडीदार’ ही नाटके केली अन् बक्षिसे मिळत गेली. अशारितीने माझे नाट्यक्षेत्रात पदार्पण झाले.
प्रश्न : ‘सोकाजीराव टांगमारे’ची निर्मिती कशी झाली?
उत्तर : मला राज्य नाट्य स्पर्धेपुरते मर्यादित राहायचे नव्हते. कलाकार म्हणून मला वैयक्तिकरीत्या अभिनयासाठी विचारणा होत होती; परंतु नाटकामध्ये सातत्य राहावे, ही तळमळ असल्याने मी नाटकांची आवड असलेल्या मुला-मुलींना एकत्र केले आणि २००७ मध्ये ‘सोकाजीराव टांगमारे’ नाटकाची निर्मिती झाली. द. मा. मिरासदारांनी लिहिलेले हे नाटक पूर्वी निळू फुले करायचे. नंतर ते बंद पडले होते. एकदा माझ्या वाचनात ही स्क्रीप्ट आली. त्यात नावीन्याची भर टाकली आणि ‘सोकाजीराव’ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या नाटकाने आम्हाला खऱ्या अर्थाने व्यावसायिक रंगभूमीवर यश मिळवून दिले. विविध पुरस्कारांबरोबरच अन्य शहरांतही नाटकाने गर्दी खेचली. आजवर त्याचे दोनशेहून अधिक प्रयोग झाले आहेत.
प्रश्न : आगामी ‘अपना सपना फनी-फनी’मधून प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार?
उत्तर : प्रत्येक माणूस स्वप्न बघत असतो. किंबहुना, स्वप्नाशिवाय आयुष्य नाही, असेच एक स्वप्न पाहिलेल्या जोडप्याच्या आयुष्यात त्या स्वप्नामुळे काय धम्माल घडते, याची मांडणी म्हणजे ‘अपना सपना फनी फनी’. कोल्हापूरला वगनाट्याची परंपरा आहे. त्यामुळे गाण्यांचा समावेश असलेले हे नाटक प्रेक्षकांना खळखळून हसवणारे असेल. धकाधकीच्या जीवनात मन:शांतीसाठी योगा, ध्यानधारणाची गरज असते. त्यातून मिळणारी अनुभूती हे नाटक प्रेक्षकांना देईल, असा माझा विश्वास आहे.
प्रश्न : कोल्हापुरात नाटकांना प्रतिसाद मिळत नाही, असा संस्थांचा आक्षेप आहे. तुझे मत काय?
उत्तर : मुंबई-पुण्यात शहरातल्या शहरात दिवसा शूटिंग आणि रात्री नाटके असे सर्वसाधारणपणे कलाकारांचे शेड्यूल असते. परगावी जायचं म्हणजे वेळ जातो. शिवाय सगळा सेटअप न्यावा लागतो. केशवराव भोसले नाट्यगृहाची क्षमताच कमी आहे. त्यात शाहू स्मारकची त्याहून कमी. त्यामुळे येथे नाटक सादर करणे संस्थांना परवडत नाही. परंतु, भविष्यात ही परिस्थिती बदलेल आणि कोल्हापूरची रंगभूमी पुन्हा बहरेल, असा माझा विश्वास आहे. - इंदुमती गणेश

Web Title: Kolhapur's play will revive: Sanjay Mohite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.