कोल्हापूरचा समृद्ध वारसा सदैव प्रेरणादायी : भूषण गगराणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:25 AM2020-12-06T04:25:14+5:302020-12-06T04:25:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूरचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक वारसा हा सदैव प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे ‘ब्रँड कोल्हापूर’करांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूरचा ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक वारसा हा सदैव प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे ‘ब्रँड कोल्हापूर’करांनी याची कायम मनात जाणीव ठेवून कोल्हापूरचा नावलौकिक आणखी वाढविण्यासाठी भविष्यातील वाटचाल करावी, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी केले. शनिवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘ब्रँड कोल्हापूर’ गौरव समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कला, क्रीडा, साहित्य, संशोधन अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या ९८ जणांचा गौरव करण्यात आला.
गगराणी म्हणाले, स्वत:चे गाव, स्वत:चे अस्तित्व, स्वत:ची संस्कृती ही आपल्यासोबत अदृश्य स्वरूपात असते. माझ्या जडणघडणीत हे गाव नसते, तर मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो; त्यामुळे आपण कोणत्याही क्षेत्रात वाटचाल करताना गावाचा तितकाच वाटा असतो. जगात कुठेही असाल तर कोल्हापूरचे नाव घेतले जाते. कोल्हापूरला दोन हजार वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलेचा समृद्ध वारसा आहे. आरक्षणाची सुरुवात, चित्रपट निर्मिती, पहिला कॅमेरा आणि देशासाठी पहिले ऑलिम्पिक पदक विजेते कोल्हापूरकर होते. त्यामुळे कोल्हापूर हे सुरुवातीपासूनच ब्रँड आहे. येथील साहित्य, कृषी आणि उद्योग क्षेत्र हे प्रेरणा देणारे आहे. ‘ब्रँड कोल्हापूर’ असलेल्या सर्वांना कोल्हापूर शहराने दिलेला वारसा याची जाणीव सतत मनात ठेवून ब्रँड कोल्हापूरकरांनी पुढील वाटचाल करावी.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, आपल्या कोल्हापूरची ओळख ही तांबडा-पांढरा रस्सा, कोल्हापुरी चप्पल एवढीच होती. मात्र, येथील रत्नांनी केलेल्या अलौकिक कामगिरीमुळे सर्वत्र नावलौकिक मिळाला आहे. ही रत्ने पुढे आली पाहिजेत. त्यांची जगभरात ओळख झाली पाहिजे. आजच्या माहिती तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या जगात कोल्हापूरचे ब्रँडिंग आपणच केले पाहिजे. ‘मी कोल्हापूरचा’ हे सांगायला विसरू नका. यासाठी अग्रेसर असले पाहिजे. नागपूर, औरंगाबाद, पुणे ही तीन शहरे राज्यात विविध क्षेत्रांत अग्रेसर आहेत. खाद्यसंस्कृतीत इंदौर प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणे कोल्हापूरही प्रसिद्ध झाले पाहिजे.
------------------------------
केवळ कोल्हापुरातच शक्य
भूषण गगराणी म्हणाले, मला नेहमी अनेकजण विचारतात, तुम्ही गगराणी आणि मराठी इतकं चांगले कसं बोलता? यावर मी कोल्हापूरचा आहे. आमच्या इथे सगळ्या भाषा मराठीतून बोलल्या जातात; त्यामुळे समोरच्याला वेगळी ओळख सांगायची गरज लागत नाही. मास्कला ‘मॅस्क’ असे म्हणणारे येथेच भेटतात, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
------------------------------
फोटो: ०५ कोल्हापूर ०१ :
कोल्हापुरात शनिवारी आयोजित केलेल्या ‘ब्रँड कोल्हापूर’ गौरव समारंभात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कोल्हापूरकरांचा राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील व गौरविण्यात आलेले सर्व मान्यवर उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)