पसंतीच्या क्रमांकातून कोल्हापूरचे ‘आरटीओ’ मालामाल
By admin | Published: June 8, 2017 06:13 PM2017-06-08T18:13:10+5:302017-06-08T18:13:10+5:30
प्रादेशिकच्या चार विभागातून वर्षभरात १६ कोटी २६ लाख जमा
आॅनलाईन लोकमत/सचिन भोसले
कोल्हापूर, दि. 0९ : गाडी दुचाकी वा चारचाकी असो त्याला क्रमांक हवा पसंतीचाच. मग त्यासाठी जादा पैसे मोजायला लागले तरी बेहत्तर असे म्हणणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अशा हव्या त्या क्रमांकासाठी कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कराड येथील १९ हजार ६२७ वाहनधारकांनी यंदाच्या वर्षात १६ कोटी २६ लाख रुपये मोजले आहेत.
विशेष म्हणजे १, ११११, २२२२, १२३४, १२३, ९,९९९९, ९२९२, ११५५, ७४७४, ६१८, १०,१००, १०००, ४०००, अशा एक ना अनेक पंसतीच्या क्रमांकाना अनेकांनी कधी लिलावाद्वारे तर कधी ठरविलेल्या शुल्कापेक्षा जादा पैसे मोजले आहेत.
दसरा, दिवाळी पाडवा, गुढीपाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत अशा शुभ मुहुर्तावर अनेक नागरीक वाहन, सोने, गृह खरेदी करीत असतात. यात जादा करुन वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मग वाहन म्हटले की लकी क्रमांक हवा, मग त्यात कुणाचा ९, तर कुणाचा ५, ७, ११, तर कुणाला ७८९, ७८६ हवा असतो. मग त्यासाठीच अनेकजण ३ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत शुल्क भरण्यास राजी होतात.
अनेकजणांना पुर्वीच्या गाडीचा क्रमांक हवा म्हणून वाहनधारक नवीन गाडी घेताना तोच क्रमांक पाहीजे म्हणून जादा पैसे मोजतात. तर अंकशास्त्रज्ञांनी तुम्हाला अमुक एक क्रमांकच शुभ आहे आणि तोच क्रमांकही घ्या असा सल्ला देतात. तर कोणाला जन्म तारीख, तर कोणाला पत्नीच्या जन्मतारीखेचीच बेरीज हवी असते. यासह अनेकांना दादा, बॉस, राज, राम, अशा एक ना अनेक नावे तयार होणारी अक्षरे हवी असतात. म्हणून अमुक एक क्रमांकच हवा म्हणून अनेक वाहनप्रेमी आगावू सिरीज सुरु होण्यापुर्वीच ‘ जंपींग’ करुन प्रसंगी जादा शुल्क भरुन असे हवे ते पसंतीचे क्रमांक घेतात.
अशा या क्रमांकाच्या प्रेमापोटी अनेकांनी गाडीच्या किंमती जवळपास पैसे भरलेले उदाहरणे आहेत. अशा या क्रमांका प्रेमापायी कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय मालामाल अर्थात महसुलात वाढ होत आहे. यंदा तर केवळ १ एप्रिल २०१६ ते ३१ मे २०१७ अखेर १६ कोटी २६ लाखांचा महसुल कार्यालयाकडे जमा झाला आहे. यंदा तर यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा कार्यालयाला आहे.
कुणाचा वाटा किती
कार्यालय वाहनधारक महसुल
कोल्हापूर ९१७७ ७ कोटी ४ लाख
सातारा ३८६४ ३ कोटी ४१ लाख
सांगली ५२७३ ४ कोटी २६ लाख
कराड १३१३ १ कोटी ५५ लाख
१९६२७ १६ कोटी २६ लाख
चर्चा ५ कोटीच्या चारचाकीची अन् ३० लाखांच्या दुचाकीची
गेल्या महिनाभरात कोल्हापूर प्रादेशिक परिवहनकडे रोल्स राईस ही महागडी ५ कोटी रुपये किंमतीच्या गाडीची नोंदणी झाली असून गाडी मालकाने करापोटी सुमारे १ कोटी रुपये प्रादेशिककडे भरले आहेत. तर परदेशी बनावटीची बीएमडब्ल्यू ही महागडी ३० लाख रुपये किंमतीची दुचाकीचीही नोंदणी झाली आहे. या दुचाकीच्या करापोटीही सुमारे ६ लाख रुपये प्रादेशिककडे वाहनमालकाने भरले आहेत. या दोन महागड्या गाडीची नोंदणी होऊन बरेच दिवस उलटले तरी या गाडीची चर्चा मात्र, अजुन जिल्ह्यात सुरुच आहे.