गुड न्यूज: कोल्हापूरच्या पोरी..करतात देश-विदेशात पंचगिरी; पुरुषांची मक्तेदारी मोडून उमटवला ठसा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 06:02 PM2024-01-01T18:02:09+5:302024-01-01T18:02:49+5:30
दीपक जाधव कोल्हापूर : कोल्हापूरची ओळख ही क्रीडानगरी असून येथील खेळाडू मध्ये कमालीची जिद्द, जिंकण्याची ईर्ष्या हे या मातीतील ...
दीपक जाधव
कोल्हापूर : कोल्हापूरची ओळख ही क्रीडानगरी असून येथील खेळाडू मध्ये कमालीची जिद्द, जिंकण्याची ईर्ष्या हे या मातीतील अंगभूत कौशल्य. याच कौशल्याच्या जोरावर हाॅकी, नेमबाजी, क्रिकेट, फुटबॉल, कुस्ती, जलतरण, बुद्धिबळ, कबड्डी अशा सर्वच खेळांमध्ये कोल्हापूरचे नाव देशभरात पोहोचवले. नुसत्या खेळातच नव्हे तर कोल्हापूरच्या चार मुलींनी हाॅकीमध्ये पंच म्हणूनही क्रीडानगरीचे नाव उज्ज्वल केले आहे.
हाॅकी तसा दुर्लक्षित राहिलेला राष्ट्रीय खेळ असून या खेळातील पंच म्हणून मुलांची मक्तेदारी मोडून काढत कोल्हापूरच्या चार मुलींनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पंचगिरीत नाव उंचावले आहे.
श्वेता पाटील आणि रमा पोतनीस या आंतरराष्ट्रीय पंच असून त्यांनी मलेशियामध्ये प्रशिक्षण घेतले असून सिद्धी जाधव व हर्षदा लाड या राष्ट्रीय पंच आहेत.
रमा पोतनीस या प्रत्येकी तीन सुवर्णपदक व रौप्यपदक विजेत्या आहेत. त्यांनी स्पेन, मलेशिया, सिंगापूर, कोरिया आदी ठिकाणी पंच म्हणून कामगिरी बजावली असून त्यांना चाचा नेहरू ॲक्सिलन्सी अवॉर्ड मिळाला आहे. अनेक वेळेस बेस्ट फाॅरवर्ड चॅम्पियन म्हणून गौरवले आहे.
श्वेता पाटील एशिया कप (ओमान), फ्रान्स वि. इंडिया टेस्ट सिरीज, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, बॅंकाॅक आदी ठिकाणी झालेल्या पंच म्हणून काम केले आहे.
राष्ट्रीय पंच हर्षदा लाड करवीर तालुक्यातील हसुर दुमालाच्या असून त्यांनी आजपर्यंत मिनी ऑलिंपिक, राज्यस्तरीय अनेक सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले आहे.
राष्ट्रीय पंच सिद्धी जाधव यांनी आजपर्यंत सब ज्युनिअर नॅशनल, वेस्ट झोन विद्यापीठस्तरावर चार वेळेस खेळल्या असून दोन वेळेस रौप्य पदक मिळाले आहे. ग्वाल्हेर, दिल्ली, अमरावती येथे झालेल्या ध्यानचंद कप ऑल इंडिया स्पर्धा, खेलो इंडिया आदी स्पर्धेत पंच म्हणून काम केले आहे.