आयुक्त कलशेट्टी यांचे कोल्हापूरच्या भगिनींनी केलं औक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 04:25 PM2020-08-03T16:25:46+5:302020-08-03T16:27:45+5:30
डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी कोल्हापुरात महापालिकेचे आयुक्त या नात्याने रहिवासी असले, तरी त्यांना आज रक्षाबंधन, राखी पौर्णिमेनिमित्त भगिनी प्रेमाची उणीव भासू नये म्हणून कोल्हापुरातील पद्माराजे संवर्धन समितीच्या भगिनींनी त्यांचं औक्षण केलं आणि त्यांना राखी बांधली.
कोल्हापूर : डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी कोल्हापुरात महापालिकेचे आयुक्त या नात्याने रहिवासी असले, तरी त्यांना आज रक्षाबंधन, राखी पौर्णिमेनिमित्त भगिनी प्रेमाची उणीव भासू नये म्हणून कोल्हापुरातील पद्माराजे संवर्धन समितीच्या भगिनींनी त्यांचं औक्षण केलं आणि त्यांना राखी बांधली.
बहिण भावाच्या अतूट आणि निर्मळ पवित्र प्रेमाची साक्ष देणारा रक्षाबंधन सण. ज्यांना भाऊ नाही अशा भगिनी चंद्राला भाऊ म्हणून त्याचं औक्षण करतात. देशपातळीवरील सनदी सेवेमुळे सर्वच अधिकारी देशात विविध ठिकाणी विखुरलेले असतात. त्यांची जन्मभूमी वेगळी आणि कर्मभूमी वेगळी अशी परिस्थिती असते.
कोल्हापूरच्या या भगिनींच्या प्रेमाने महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यांचे मन भरून आले आणि त्यांचे डोळे सुद्धा क्षणभर पाणावले. कोल्हापूरचे हे भगिनी प्रेम आपण आयुष्यभर मनाच्या कोंदणात जपून ठेवू अशा शब्दांची कलशेट्टी यांनी या बहिणींना ओवाळणी घातली.
कोल्हापूरच्या माणसांच्या मनामनात हृदयात उसाचा गोडवा भरलेला आहे. कोल्हापूरचे नागरिक समोरच्या माणसाला आपल्या प्रेमाने जिंकतात आणि परका माणूस बघता बघता कोल्हापूरचा एक भाग बनून जातो.
गेली दीड वर्ष कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यासारखा एक अधिकारी स्वतः हातात झाडु घेवुन सफाईची मोहीम राबवतो, हे चित्र कोल्हापूरवासीयांनी प्रथमच पाहिले. कोरोना काळात कलशेट्टी रोज अठरा-अठरा तास काम करत आहे. त्यांनी या कार्याला झोकुन दिल्यामुळे त्यांना घरादाराचा विसरच जणू पडलाय, ईतके ते कामामध्ये गुंतून पडले.
आज रक्षाबंधन असल्यामुळे त्यांना त्यांच्या सख्य बहिणीकडे जाता येत नाही हे लक्षात आल्यामुळे आणि त्यांच्या बहिणीची उणीव भरून काढण्यासाठी कोल्हापूरातील पद्माराजे संवर्धन समितीच्या भगिनींनी पुढाकार घेतला.
सरिता सासने, आरती वाळके, गीता डाकवे, मंगल आंब्रे यांनी आज कलशेट्टी यांचे औक्षण केले, त्यांच्या हाती राखी बांधली. अनपेक्षितपणे समोर आलेल्या या भगिनींच्या प्रेमानं डॉक्टर कलशेट्टी यांचं मन भरून आले, आणि त्यांचे डोळे क्षणभर पाणावले. ध्यानी मनी नसताना हा हळवा प्रसंग घडल्यामुळे त्यांचे सहकारी सुद्धा भारावून गेले.
कोल्हापूरचे हे भगिनी प्रेम आपण देशाच्या कोणत्याही कानाकोपर्यात असलो तरी मनाच्या कोपऱ्यात मात्र आयुष्यभर जपून ठेवीन अशा शब्दांची ओवाळणी कलशेट्टी यांनी या भगिनींना घातली.