एका लाखाचे १.७२ लाख मिळवा; कोल्हापुरातील व्ही. पी. ट्रेडिंग कंपनीने घातला गंडा
By उद्धव गोडसे | Published: November 30, 2023 12:50 PM2023-11-30T12:50:28+5:302023-11-30T12:50:47+5:30
प्रमुखांकडून गुंतवणूकदारांना दमदाटी
उद्धव गोडसे
कोल्हापूर : रंकाळा येथील व्ही. पी. ट्रेडिंग अँड कन्सलटन्सी कंपनीने दरमहा सहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. याबाबत प्रसाद शामराव घोरपडे (रा. फुलेवाडी, चौथा बसस्टॉप, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. फसवणुकीची रक्कम २० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता गुंतवणूकदारांकडून वर्तवली जात आहे.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवणारी कार्यालये शहराच्या गल्ली-बोळात सुरू आहेत. दर आठवड्याला एका कंपनीकडून फसवणूक झाल्याचे उघडकीस येत असतानाही, गुंतवणूकदारांना जादा परतावा मिळवण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळेच फसवणुकीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. रंकाळा येथील व्ही. पी. ट्रेडिंग अँड कन्सलटन्सी कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केली.
तक्रारदार प्रसाद घोरपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मित्राने त्यांना व्ही. पी. ट्रेडिंग कंपनीची माहिती दिली. दरमहा सहा टक्के परतावा आणि १२ महिन्यांनी मुद्दल परत देण्याच्या योजनेत त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानुसार घोरपडे यांनी जून २०२१ ते जुलै २०२२ या काळात टप्प्या-टप्प्याने कंपनीत नऊ लाख रुपये गुंतवले. नोव्हेंबर २०२२ पासून त्यांना परतावे मिळणे बंद झाले. त्यानंतर त्यांनी कंपनीचे प्रमुख वैभव पाटील आणि मॅनेजर रोहित वरेकर (दोघेही रा. अंबाई टँक, कोल्हापूर) यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, दोघांनी घोरपडे यांना धमकावून पैसे देण्यास नकार दिला.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच घोरपडे यांनी २३ नोव्हेंबरला जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. अर्ज देऊन आठवडा उलटला तरी अजूनही पोलिसांनी त्यांनी फिर्याद नोंदवून घेतलेली नाही. तसेच कंपनीची चौकशीही केलेली नाही. पोलिसांनी फिर्याद न घेतल्यास पोलिस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज देणार असल्याची माहिती गुंतवणूकदार घोरपडे यांनी दिली.
अशी होती योजना..
एक लाखाच्या पुढे गुंतवणूक केल्यास दरमहा सहा टक्क्याने परतावा दिला जाणार. तसेच १२ महिन्यांनंतर एक लाखाची मुद्दलही परत दिली जाणार. म्हणजे लाखाच्या गुंतवणुकीवर वर्षभरात एक लाख ७२ हजार रुपये देण्याचा लेखी करार कंपनीने केला होता.
व्यावसायिक, नोकरदारांनी केली गुंतवणूक
कंपनी सेबीकडे नोंदणीकृत असल्याचे सांगत कंपनीचे प्रमुख वैभव पाटील यांनी करारपत्र आणि गुंतवणुकीच्या रकमेची पावतीही गुंतवणूकदारांना दिली. कंपनीच्या आमिषांना भुलून व्यावसायिक, नोकरदार आणि काही ज्येष्ठ नागरिकांनीही व्ही. पी. ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्याची माहिती समोर येत आहे.
फोन बंद अन् दमदाटी
गुंतवलेल्या पैशांची मागणी करताच कंपनीचा प्रमुख वैभव पाटील आणि मॅनेजर रोहित वरेकर यांनी मोबाइल नंबर बंद केले आहेत. त्यांच्याकडून दमदाटी केली जात आहे, अशी तक्रार गुंतवणूकदारांनी केली आहे.