ताकदीसोबतच चपळाई; डोळ्यांत धग अन् अंगात ‘रग’बी, कोल्हापूरच्या वैष्णवी, कल्याणी आशियाई रग्बी स्पर्धेसाठी भारतीय संघात
By सचिन भोसले | Published: September 21, 2023 01:29 PM2023-09-21T13:29:12+5:302023-09-21T13:29:21+5:30
सचिन भोसले कोल्हापूर : रग्बी हा खेळ ताकदीसोबतच चपळाईने खेळला जाणारा खेळ म्हणून ओळखला जातो. विशेषतः परदेशात हा खेळ ...
सचिन भोसले
कोल्हापूर : रग्बी हा खेळ ताकदीसोबतच चपळाईने खेळला जाणारा खेळ म्हणून ओळखला जातो. विशेषतः परदेशात हा खेळ लोकप्रिय ठरला आहे. अशा ताकदीच्या खेळात प्राविण्य मिळवायचे म्हणजे तेवढ सोप काम नाही. अशा दमदार खेळात पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील वैष्णवी दत्तात्रय पाटील व कल्याणी कृष्णात पाटील या दोघींनी कोल्हापूरचा झेंडा अटकेपार नेला आहे. या दोघींची चीनमध्ये होणाऱ्या आशियाई रग्बी स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. दोघीही बुधवारी चीनला रवाना झाल्या.
रग्बी तसा ताकदीचा खेळ. यात समोरच्या व्यक्तीला प्रसंगी उडवून पुढे जावे लागते. त्यामुळे अंगमेहनत आणि प्रचंड ऊर्जा शरीरात असावी लागते. त्यासाठी खुराक आणि सरावही महत्त्वाची बाब आहे. परदेशी लाेकांना या सर्व बाबी सहज उपलब्धही होतात. मात्र, भारतात आणि त्यात कोल्हापुरातील छोटेसे गाव असलेल्या पाडळी खुर्द (ता. करवीर) मध्ये अशक्य गोष्ट आहे. अशक्य वाटणारी ही गोष्ट साध्य वैष्णवीने साध्य केली आहे.
रग्बी खेळासाठी एका शाळेत वैष्णवीने प्रवेश घेतला. त्यासाठी सराव सातत्य आवश्यक म्हणून ती मैदानावर दिसू लागली. ही बाब अन्य विद्यार्थ्यांना व शिक्षकांना आवडेना. त्यांनी तक्रार केली. मग तिने तर शाळाच सोडण्याचा निर्णय घेतला. मग सुरू झाला खरा संघर्ष. तीने पाडळी ते कोल्हापूर असे वीस किलोमीटर सायकलवरून शाळेला येण्यास सुरुवात केली. राष्ट्रीय प्रशिक्षक दीपक पाटील व जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रा. अमर सासने यांच्या सहकार्याने तिने या खेळात मागे वळून बघितले नाही. सात राष्ट्रीय आणि ३ आंतरराष्ट्रीय स्पर्धात तिने चमकदार कामगिरी केली आणि देशाचे नाव उज्ज्वल केले. विशेष म्हणजे तिचे वडील रिक्षाचालक म्हणून काम करतात.
अशीच गाथा तिची साथीदार कल्याणी कृष्णात पाटील हिचीसुद्धा आहे. सारवायचे घर आणि बसायला गोधडी असे अत्यंत साधे घर आहे. साताविश्व दारिद्र्य अशी परिस्थिती आहे. तिचे वडील तर सुरक्षारक्षक म्हणून मिळेल तेथे काम करतात, तर आई शेतमजूर म्हणून काम करते. तिचे घर वडिलांच्या तुटपुंज्या पगारात आणि दुधाच्या पैशावर घर चालते. तीही शिवाजी पेठेतील न्यू काॅलेजमध्ये शिकते. पैशाअभावी एकवेळ तर खेळ आणि काॅलेज सोडून जायचा, असा निर्णय तिने घेतला होता. ही बाब प्रशिक्षक पाटील व प्रा. सासने यांना समजल्यानंतर त्यांनी प्रिन्स मराठा बोर्डिंग हाउस संस्थेमार्फत वर्षभराचा खर्च उचलला आणि आज तीही चीनला वैष्णवीसोबत रवाना झाली.
सराव असा..
दोघीही पाडळी ते न्यू काॅलेज, शिवाजी पेठ सायकलवरून येतात. तिथे इतर मुलींसोबत ५०० सपाट्या, जोर बैठका, जीमचा व्यायाम, धावणे असा पुरुषांनाही लाजवेल असा व्यायाम करतात.
ज्या परिस्थितीतून आम्ही आलो आहोत. त्याची जाण आहे. या स्पर्धेत देशाला पदक जिंकून देणार आणि कोल्हापूरचे नाव सातासमुद्रापार करणार. - वैष्णवी पाटील, आंतरराष्ट्रीय रग्बीपटू
आई-वडिलांची जबाबदारी आणि सासने, पाटील सरांनी दाखविलेल्या विश्वासामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. देशासाठी जिवाचे रान करून पदक जिंकून आणणारच. - कल्याणी पाटील, आंतरराष्ट्रीय रग्बीपटू