कोल्हापूर आघाडीत उमेदवारीचा गुंता

By Admin | Published: September 15, 2014 12:44 AM2014-09-15T00:44:57+5:302014-09-15T00:49:50+5:30

महायुतीची व्यूहरचना निश्चित : ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही काँग्रेसमध्ये तणाव, संभ्रम

Koli Ganguly in Kolhapur Front | कोल्हापूर आघाडीत उमेदवारीचा गुंता

कोल्हापूर आघाडीत उमेदवारीचा गुंता

googlenewsNext

भारत चव्हाण -कोल्हापूर -कोल्हापूर उत्तर मतदारसंघ कॉँग्रेसच्या वाट्याला गेला आहे; परंतु गतवेळच्या पराभवातून न सावरलेल्या मालोजीराजे छत्रपती यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्यामुळे या जागेवर राष्ट्रवादी कॉँग्रेसने हक्क सांगितला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोन कॉँग्रेसमध्ये तणाव, संभ्रम आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मतदारसंघ कोणाला जाणार याविषयी इच्छुक असणाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता वाढली आहे.
कॉँग्रेसकडून नगरसेवक सत्यजित कदम, माजी महापौर प्रल्हाद चव्हाण व त्यांचे पुत्र सागर चव्हाण यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. कदम यांनी गेल्या दोन-तीन वर्षांपासून जोर लावला असून शहरातील अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी गणेशोत्सवात जवळीक साधली आहे. त्यांना उमेदवारी मिळाल्यास खासदार धनंजय महडिक, आमदार महादेवराव महाडिक यांचे प्रत्यक्ष सहकार्यही मिळणार आहे.
मात्र, बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर कदम यांना काँग्रेस गोटातूनच मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. दक्षिण मतदारसंघात आमदार महादेवराव महाडिक यांचा होत असलेला हस्तक्षेप आणि त्यातून त्यांच्यात आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यात होत असलेल्या राजकीय तणावाचा फटका कदम यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याची सुरुवातही झाली आहे. त्याचे कारण म्हणजे माजी महापौर सागर चव्हाण यांचे अचानक पुढे आलेले नाव हेच आहे. सागर चव्हाण यांनी निवडणुकीची कसलीही तयारी केली नाही, तरीही त्यांनी उमेदवारी मागून सर्वांनाच चकित केले. प्रल्हाद चव्हाण हे कॉँग्रेसचे क्रियाशील कार्यकर्ते असले तरी निवडणूक लढविण्याचे त्यांचे वय नाही. त्यामुळे मला नाही तर मुलाला द्या, असा त्यांचा आग्रह राहील आणि त्यास मंत्री सतेज पाटील यांचे सहकार्य राहील, असे चित्र आहे. अशावेळी निवडणूक लढविण्याची तयारी केलेल्या सत्यजित कदम यांच्यासमोर एक तर बंडखोरी करणे किंवा दुसऱ्या पक्षाची उमेदवारी मिळविणे असे पर्याय राहतात.
राष्ट्रवादीने या मतदारसंघावर दावा करून उत्सुकता आणि उत्कंठा तसेच तणाव वाढवून ठेवला आहे. आर. के. पोवार यांनाच उमेदवारी देऊन निवडून आणण्याचा इरादाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकदा बोलून दाखविला होता. माजी नगरसेवक संभाजी देवणे यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली असली तरी त्यांचा टिकाव या शर्यतीत लागणार नाही,असे दिसते. जर राष्ट्रवादीकडे ही जागा गेलीच तर आर. के. यांच्याऐवजी सत्यजित कदम यांचेही नाव पुढे येऊ शकते. कॉँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये जागा वाटप आणि उमेदवारी निश्चित करण्यावरून निर्माण झालेल्या गोंधळामुळे शिवसेनेच्या गोटात काहीसे आनंदाचे वातावरण आहे. कारण आता कोणालाही मतदारसंघ गेला आणि कोणालाही उमेदवारी मिळाली तरी दगाबाजीचा धोका आघाडीतच आहे.
शिवसेनेच्या क्षीरसागर यांनी एकतर्फी तयारी केली आहे. शिवसेनेतही काही प्रमाणात नाराजी आहे. प्रबळ दोन गट आहेत; परंतु त्याचा अधिक फटका क्षीरसागर यांना बसेल, असे वाटत नाही. कॉँग्रेस आघाडीतूनच त्यांना सहकार्य होण्याची शक्यता आहे. एकंदरीत विचार केला तर कोल्हापूर दक्षिणमधील राजकारणाचे पडसाद या मतदार- संघावर उमटणार आहेत एवढे नक्की!
डाव्या आघाडीने भाकपच्या रघुनाथ कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. सध्या शहरातील डाव्या आघाडीची ताकद पाहता या पक्षाला फारशा अपेक्षाही नाहीत; परंतु निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाचे अस्तित्व आणि कार्यकर्त्यांना बांधून ठेवणे हेच त्यांचे मुख्य धोरण राहील. त्यामुळे या मतदारसंघात खरी लढत ही महायुती विरुद्ध कॉँग्रेस आघाडी यांच्यात होणार आहे. महायुतीचा मल्ल ठरलेला आहे. आघाडीचा मल्ल कोण हे निश्चित झालेले नाही. आघाडीचा उमेदवार किती ताकदीचा असेल त्यावरच निवडणुकीचे रंगत ठरणार आहे.
शिवसेना-भाजप महायुतीचा वारु रोखण्यासाठी कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीने जोरदार तयारी केली असली तरी कोल्हापूर उत्तर मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार तसेच त्यांचा उमेदवार कोण असणार हेच अद्याप निश्चित न झाल्याने कॉँग्रेस आघाडीच्या पातळीवर प्रचंड संभ्रमावस्था आहे. दुसरीकडे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सलग दुसऱ्या विजयासाठी व्यूहरचना निश्चित करून कामालाही सुरुवात केलीय. या निवडणुकीत फंदफितुरीचे राजकारण शिवसेनेपेक्षा कॉँग्रेस आघाडीत अधिक होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Web Title: Koli Ganguly in Kolhapur Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.