कोल्हापुरातील विमानसेवा खंडित; प्रवाशांतून नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 06:32 PM2018-06-27T18:32:37+5:302018-06-27T18:38:50+5:30
तब्बल सहा वर्षांनंतर सुरू झालेली कोल्हापूरची विमानसेवा अवघ्या दोनच महिन्यांमध्ये खंडित झाल्याने प्रवाशांसह कोल्हापूरकरांतून नाराजी व्यक्त होत आहे.
कोल्हापूर : तब्बल सहा वर्षांनंतर एप्रिलमध्ये सुरू झालेली कोल्हापूरची विमानसेवा पुन्हा खंडित झाली आहे. तांत्रिक कारणामुळे एअर डेक्कन कंपनीने कोल्हापूर-मुंबई विमानसेवा थांबविली आहे. विमानसेवा अवघ्या दोनच महिन्यांमध्ये खंडित झाल्याने प्रवाशांसह कोल्हापूरकरांतून नाराजी व्यक्त होत आहे.
इंडिगो आणि स्पाईसजेट कंपनीने कोल्हापुरातून सेवा देण्याची तयारी दाखविली आहे. यातील केंद्र सरकारच्या उडान योजनेतंर्गत कोल्हापूर-मुंबई विमानसेवा एअर डेक्कनच्यावतीने दि. १७ एप्रिलपासून सुरू झाली.
आठवड्यातील रविवार, मंंगळवार आणि बुधवारी विमानसेवा सुरू होती. त्याला कोल्हापुरातून चांगला प्रतिसाद मिळाला. जुलैच्या दुसऱ्या आठवड्याअखेरपर्यंत प्रवाशांनी नोंदणी केली आहे. मात्र, अचानकपणे एअर डेक्कनने तांत्रिक कारणामुळे या आठवड्यातील फ्लाईट रद्द केल्या. त्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली.
दरम्यान, याबाबत एअर डेक्कनचे कोल्हापुरातील व्यवस्थापक नंदकुमार गुरव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कंपनीने तांत्रिक कारणामुळे कोल्हापूर-मुंबई विमानसेवा थांबविली असल्याचे सांगितले.
कायमस्वरूपी सेवा सांगूनही खंडित
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरळीत, कायमस्वरूपी सुरू करावी, अशी अपेक्षा या कंपनीचे मालक कॅप्टन गोपीनाथ यांच्याकडे व्यक्त केली. त्यावेळी ही विमानसेवा कायमस्वरूपी सुरू केली जाईल, असे कॅप्टन गोपीनाथ यांनी सांगितले होते. मात्र, अवघ्या दोनच महिन्यांत त्यांच्याकडून कोल्हापूरची सेवा खंडित झाली.
सरकारची मदत, प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असताना देखील एअर डेक्कन कंपनीने तांत्रिक कारण पुढे करून कोल्हापूर-मुंबई विमानसेवा थांबविली आहे, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. ते म्हणाले, आठ-दहा दिवसांत सेवा पुन्हा सुरू केली नाही, तर या कंपनीला ‘ब्लॅक लिस्ट’ करण्याची मागणी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे करणार आहे.