पेपरफुटीबाबत कोकण मंडळ सतर्क

By admin | Published: March 10, 2017 11:10 PM2017-03-10T23:10:47+5:302017-03-10T23:10:47+5:30

मोबाईल, इंटरनेट वापरावर प्रतिबंध; सहायक परीरक्षकाच्या अधिकारात वाढ

The Konkan Board's alert about paperfruit | पेपरफुटीबाबत कोकण मंडळ सतर्क

पेपरफुटीबाबत कोकण मंडळ सतर्क

Next

सागर पाटील -- टेंभ्ये --परीक्षेच्या सुरुवातीच्या काळातच मुंबई, अमरावती व पुणे विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत बारावी परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्रकार घडल्यानंतर कोकण मंडळ सतर्क झाले आहे. हा गैरप्रकार थांबविण्यासाठी राज्य मंडळाने कडक उपाययोजना केली आहे. परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक व परीरक्षक यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही घटकाला मोबाईल अथवा तत्सम साधने वापरण्यास सक्त बंधन घालण्यात आले आहे. परीरक्षक कार्यालयातून प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या साहायक परीरक्षकाच्या अधिकारात वाढ करण्यात आली असून, त्यांना बैठ्या पथकाचे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पेपरफुटीसारख्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य मंडळाने परीक्षा केंद्रावर परीक्षा कालावधीत भ्रमणध्वनी, टॅबलेट, अन्य इंटरनेट साधने तसेच डिजिटल घड्याळ वापरावर सक्त निर्बंध घातले आहेत. या साधनांच्या माध्यमातूनच पेपर फोडले जात असल्याने परीरक्षक व केंद्र संचालकाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही घटकाकडे भ्रमणध्वनी अथवा अन्य साधन असणार नाहीत, याची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबतचे परिपत्रक कोकण शिक्षण मंडळाने प्रसिद्ध केले आहे.
प्रश्नपत्रिका वितरणाबाबतही अधिक दक्षता घेण्यात येणार आहे. निर्धारित वेळेपूर्वी व आवश्यक कार्यपद्धतीचा वापर न करता प्रश्नपत्रिका पाकिटे उघडली जाऊ नयेत, यासाठी काटेकोर तरतूद करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका केंद्रावर दिल्यापासून उत्तरपत्रिका परीरक्षकाकडे जमा करेपर्यंत सर्व प्रक्रियेचे पूर्णवेळ परीक्षा केंद्रावर थांबून निरीक्षण व नियंत्रण करण्याचे अधिकार साहाय्यक परीरक्षकांना देण्यात आले आहेत. या बाबीचा अहवाल दैनंदिन स्वरूपात परीरक्षकाकडे सादर करणे साहाय्यक परीरक्षकांना बंधनकारक करण्यात आले आहे.
यावर घातली आहेत बंधने
पेपरफुटीसाठी आधुनिक सुविधांचा वापर केला जात असल्याने मोबाईल, टॅबलेट किंवा इंटरनेटचा वापर करता येणारी साधने परीक्षा केंद्रावर नेण्यास बंधन घालण्यात आले आहे. तसेच परीक्षा केंद्रावर डिजिटल घड्याळ वापरण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहे.

काटेकोर अंमलबजावणी सुरू
पेपरफुटीचा गैरप्रकार थांबविण्यासाठी राज्य मंडळाने निश्चित केलेल्या उपाययोजनांची कोकण मंडळाने काटेकोरपणे अंमलबजावणी केली आहे. कोकण मंडळाच्या कार्यक्षेत्रात असा कोणताही गैरप्रकार घडणार नाही, याची सर्व प्रकारची काळजी विभागीय मंडळ व प्रशासकीय यंत्रणा घेत आहे.
- डॉ. शकुंतला काळे, अध्यक्ष, कोकण परीक्षा मंडळ


उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची होणार नोंद
परीक्षा केंद्रावर सकाळी १०.३० नंतर ११.३० पर्यंत येणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर पेपर फुटला तर सकाळच्या वेळात त्याचे वितरण होऊ शकते. त्यामुळे उशिरा येणाऱ्यांची स्वतंत्र नोंद ठेवली जाणार आहे.

Web Title: The Konkan Board's alert about paperfruit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.