पीकविम्यात कोकण, कोल्हापूर विभाग उदासीन, बीडमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांचा सहभाग
By राजाराम लोंढे | Published: July 18, 2023 12:16 PM2023-07-18T12:16:05+5:302023-07-18T12:16:47+5:30
या पिकांना मिळणार लाभ
राजाराम लोंढे
कोल्हापूर : प्रधानमंत्री पीकविमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी सरकारने एक रुपयात विमा उपलब्ध करून दिला आहे. मात्र, कोकण व कोल्हापूर विभागातील शेतकऱ्यांमध्ये उदासीनता दिसत आहे. कोकण विभागात केवळ १८ हजार ७०६, तर कोल्हापूर विभागात ६२ हजार ७२६ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. राज्यात सर्वाधिक बीड जिल्ह्यातील ९ लाख ८४ हजार शेतकरी योजनेत सहभागी झाले आहेत.
निसर्ग लहरी बनल्याने शेती बेभरवसाची झाली आहे. मान्सून वेळेत सुरू होत नाही आणि नेमके काढणीच्या वेळी पाऊस असल्याने पिकांचे नुकसान होते. यासाठी सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू केली आहे. मागील हंगामापर्यंत विमा हप्त्यातील काही रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत होती. मात्र, यावर्षीपासून एक रुपयात विमा योजना सुरू केल्याने राज्यातील बहुतांशी शेतकरी या योजनेत सहभागी होतील, असा कृषी विभागाचा अंंदाज आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२३ ही अंतिम मुदत आहे. आतापर्यंत राज्यातील आठ कृषी विभागांत ६६ लाख ११ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. गेल्या वर्षी ९६ लाख ६२ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला होता. त्या तुलनेत ६८ टक्केच सहभाग दिसत आहे. विमा उतरवण्यात कोकण व कोल्हापूर विभागात उदासीनता दिसते.
पीकविम्याचा बीड पॅटर्न
बीड जिल्ह्यात प्रत्येक वर्षी सर्वाधिक शेतकरी पीकविमा काढतात. येथे पाऊस कमी असल्याने पिकांची जोखीम अधिक असते. ११० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले तर निकषानुसार विमा कंपनी भरपाई देते आणि त्यावरील सरकार भरपाई देत असल्याने येथील शेतकऱ्यांची संख्या अधिक दिसते.
या पिकांना मिळणार लाभ
खरीप हंगामातील भात (धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, खरीप कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू आहे.
भाताबाबत निकष बदलण्याची गरज
भात हे जलप्रिय पीक असल्याने ते सात-आठ दिवस पाण्याखाली राहिले तरी त्याचे नुकसान होत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने भाताला काढणीनंतर सुखवताना काही नुकसान झाले तरच विम्यातून भरपाई मिळू शकते, हा निकष लावला आहे. हा निकष बदलण्याची गरज आहे.
पीकविमा भरणारे पहिले दहा जिल्हे
बीड - ९,८४,७८६
नांदेड - ७,१५,९३८
छ. संभाजीनगर - ६,०८,५६९
जालना - ५,६५,४००
परभणी - ४,३७,,५२०
लातूर - ४,१७,७६५
यवतमाळ - ४,०३,४९०
उस्मानाबाद - ३,७६,९२५
बुलढाणा - ३,४०,३७८
अहमदनगर - २,२८,४२९
कमी सहभाग असलेले शेतकरी -
रत्नागिरी -३८८
सिंधुदुर्ग - ८२१
रायगड - २३८३
कोल्हापूर - २४९३