कोपार्डे बाजाराने कोल्हापूर-गगनबावडा मार्गच ब्लाॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:26 AM2021-02-24T04:26:43+5:302021-02-24T04:26:43+5:30

प्रकाश पाटील लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : कोपार्डे (ता. करवीर) येथे शनिवारी भरणाऱ्या जनावरांच्या आठवडी बाजारामुळे कोल्हापूर-गगनबावडा राज्य मार्गच ...

Koparde Bazaar blocks the Kolhapur-Gaganbawda route | कोपार्डे बाजाराने कोल्हापूर-गगनबावडा मार्गच ब्लाॅक

कोपार्डे बाजाराने कोल्हापूर-गगनबावडा मार्गच ब्लाॅक

Next

प्रकाश पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपार्डे : कोपार्डे (ता. करवीर) येथे शनिवारी भरणाऱ्या जनावरांच्या आठवडी बाजारामुळे कोल्हापूर-गगनबावडा राज्य मार्गच ब्लॉक हाेत आहे. बाजारात गाड्यांचे पार्किंग आणि इतर विक्रेते मात्र रस्त्याच्या दुतर्फा बसत असल्याने वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे. साखर कारखान्यांच्या हंगामात तर पुरती वाहतूक विस्कळीत होत असल्याने वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळते.

कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव, मूरगूड नंतर कोपार्डे येथे जनावरांचा मोठा बाजार भरतो. मिरज, सांगोला, कराड आदी भागातून जनावरांचे व्यापारी, शेतकरी मोठ्या संख्येने बाजारात येतात. सुरुवातीला हा बाजार जनावरांच्या खरेदी-विक्रीपुरता मर्यादित होता. पण आता या बाजारात जनावरांच्या बरोबर अनेक अनुषंगिक विक्रेते येत असल्याने विक्रेत्यांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, त्यांच्या बसण्याचे व्यवस्थापन याेग्य नसल्याने विक्रेते थेट रस्त्याच्या दुतर्फा बसतात. भाजीपाला, फळविक्रेते, मसाले, मिरची याचबरोबर खरेदी विक्रीसाठी येणारे सर्वच जण आपल्या दुचाकी कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावरच पार्किंग करतात.

जनावरांंच्या बाजारासाठी प्रशस्त जागा आहे. यामुळे रस्त्यावर जनावरे आणली जात नाहीत. पण भाजीपाला, फळविक्रेते, मसाले, मिरची, कपडे विक्रेते थेट रस्त्यावर आपली दुकाने मांडतात. त्याचबरोबर येथे येणारे ग्राहक आपली दुचाकी कोल्हापूर-गगनबावडा मार्गाच्या दोन्ही बाजूला पार्किंग करतात. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरून चार साखर कारखान्यांची ऊस वाहतूक होत असते. याशिवाय हा मार्ग दाट रहदारीचा असल्याने शनिवारी या मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी पहावयास मिळते. (उद्याच्या अंकात यड्राव बाजार)

ही आहे पर्यायी व्यवस्था

जनावरांच्या बाजारासाठी मोठी जागा आहे. तिथे जनावरे व इतर विक्रेत्यांना बसण्याचे नियाेजन करणे गरजेचे आहे. रस्त्याच्या शेजारी बसणाऱ्या विक्रेत्यांना सक्तीने तिथे बसविले तर या मार्गावरील वाहतुकीची कोंडी कायमची सुटू शकते.

कोट-

कोल्हापूर-गगनबावडा राज्य मार्ग आहे, पार्किंगसह किरकोळ विक्रेत्यांना शिस्त लावणे गरजेचे आहे. यासाठी जागा उपलब्ध असून नियोजन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

-धनाजी पाटील (माजी उपसरपंच व सदस्य)

फोटो ओळी : कोपार्डे (ता. करवीर) येथील शनिवारचा बाजार असा रस्त्यावर आल्याने कोल्हापूर ते गगनबावडा राज्य मार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. (फोटो-२३०२२०२१-कोल-कोपार्डे)

Web Title: Koparde Bazaar blocks the Kolhapur-Gaganbawda route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.