कोपर्डी, आरक्षण, सीमाप्रश्नासह दहा मागण्यांचे निवेदन सादर

By admin | Published: October 16, 2016 12:10 AM2016-10-16T00:10:14+5:302016-10-16T00:10:14+5:30

सहा तरुणींनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Kopardi, Reservation, Seventh Questionnaire, with the request of ten demands | कोपर्डी, आरक्षण, सीमाप्रश्नासह दहा मागण्यांचे निवेदन सादर

कोपर्डी, आरक्षण, सीमाप्रश्नासह दहा मागण्यांचे निवेदन सादर

Next

कोल्हापूर : कोपर्डी प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना सहा महिन्यांत फाशी द्यावी, मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न त्वरित सोडवावा, यासह दहा मागण्यांचे निवेदन मराठा क्रांती मूक मोर्चाच्या वतीने शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना देण्यात आले. दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी चोख पोलिस बंदोबस्तात संयोजन समितीने निवड केलेल्या सहा तरुणींनी हे निवेदन दिले.
या मोर्चामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणे, हा महत्त्वाचा नियोजनाचा भाग होता. निवेदन देण्यासाठी ॠतुजा माणिक पाटील, मानसी नितीन सरनोबत, शिवानी रवींद्र सासने, कोमल संजय मिठारी, शिवानी विक्रमसिंह जाधव आणि प्रज्ञा प्रकाश भोईटे या सहा तरुणींची निवड करण्यात आली होती. सकाळी ११च्या सुमारास या तरुणींना जिल्हाधिकारी कार्यालयात आणले गेले. यानंतर दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी जिल्हाधिकारी दालनामध्ये या तरुणींना चोख पोलिस बंदोबस्तात नेण्यात आले.
लगेचच जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांना निवेदन देण्यात आले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला काही सांगायचे आहे का, अशी विचारणा केल्यानंतर आमच्या मागण्या निवेदनात मांडल्या आहेत. त्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, अशी आमची मागणी असल्याचे या तरुणींनी सांगितले, तेव्हा तुमच्या भावना शासनापर्यंत त्वरित पोहोचवू, असे जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी सांगितले. त्यानंतर या तरुणी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामधून बाहेर पडल्या. (प्रतिनिधी)
या तरुणींनी दिले निवेदन
शिवानी रवींद्र सासने रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर (न्यू कॉलेज, टीवाय. बी.कॉम.)
ॠतुजा माणिक पाटील, राजारामपुरी सातवी गल्ली, कोल्हापूर (अभियांत्रिकी दुसरे वर्ष)
मानसी नितीन सरनोबत, माळी गल्ली, शिवाजी पेठ कोल्हापूर (अकरावी कॉमर्स)
प्रज्ञा प्रकाश भोईटे, वडरगे रोड गडहिंग्लज (बीई)
शिवानी विक्रमसिंह जाधव, न्यू शाहूपुरी कोल्हापूर (विवेकानंद कॉलेज- बी.एस्सी.)
कोमल संजय मिठारी, रा. मरगाई गल्ली, शिवाजी पेठ (डी. डी. शिंदे कॉलेज एसवाय. बी.कॉम.)
जिल्हाधिकाऱ्यांकडून आस्थेवाईकपणे चौकशी
जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी हे सकाळी पावणेदहालाच आपल्या दालनात उपस्थित होते. त्यांच्या दालनात गेल्यानंतर सर्वांना त्यांनी बसायला सांगितले. त्यानंतर निवेदन स्वीकारले. निवेदन देणाऱ्या तरुणींसाठी पाणी आणण्यास सांगितले. त्यानंतर या तरुणींना तुम्हाला काही सांगायचे आहे का, अशी विचारणा केली. त्यांचे निवेदन ऐकून घेऊन उपस्थित महिलांनाही त्यांनी काही सांगायचे आहे का, अशी विचारणा केली आणि
भावना शासनाला कळविण्याचे आश्वासन दिले.
कोपर्डी प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून सहा महिन्यांत आरोपींना फाशी द्या.
मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्या.
अट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करणे.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या.
कै. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास पाच हजार कोटींची आर्थिक तरतूद करा.
छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने मराठा समाजातील तरुणांना किमान कौशल्य विकास, उद्योग व नोकरी यासाठी स्वायत्त संस्था स्थापन करण्यात यावी.
१९ फे ब्रुवारी या एकाच दिवशी सर्वत्र शिवजयंती साजरी करण्यात यावी.
अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे स्मारक २०१७ पूर्वी पूर्ण करावे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न त्वरित सोडवावा.
 

Web Title: Kopardi, Reservation, Seventh Questionnaire, with the request of ten demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.