कोरगावकर ट्रस्टची वैद्यकीय सेवेची गुढी-अन्नछत्रानंतर आता मोफत औषधोचारही मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 05:06 PM2019-04-04T17:06:46+5:302019-04-04T17:09:01+5:30
समाजसेवेचा पिढ्यानपिढ्यांचा वारसा जपणाऱ्या कोरगावकर ट्रस्टने गरजूंना पोटभर खायला अन्न दिल्यानंतर आता रुग्णसेवाही करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूर: समाजसेवेचा पिढ्यानपिढ्यांचा वारसा जपणाऱ्या कोरगावकर ट्रस्टने गरजूंना पोटभर खायला अन्न दिल्यानंतर आता रुग्णसेवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर या मोफत वैद्यकीय सेवेची गुढी शिरोली नाक्यावरील कोरगावकर पेट्रोलपंपासमोर उभारली जाणार आहे. गरजूंना तपासणी, उपचार, औषधे मोफत देण्याचा हा उपक्रम दर सोमवारी सकाळी १0 ते दुपारी २ या वेळेत अव्याहतपणे सुरु राहणार आहे.
जगण्यासाठी माणसाला पोटभर अन्न आणि चांगल्या आरोग्यासाठी योग्य औषधोपचार वेळेत आणि तेही रास्त किंमतीत मिळणे महत्वाचे असते, पण अलीकडे या दोन्हीही गोष्टी सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेल्या नाहीत. याची जाणिव असल्यानेच कोरगावकर ट्रस्टने पेट्रोलपंपावर मोफत अन्नछत्र सुरु केले. या अन्नछत्रात रोज हजारभर माणसे सुग्रास अन्नाचा आस्वाद घेतात. आतापर्यंत एक लाखाहून अधिक जणांनी याचा लाभ घेतला आहे. गरजूंच्या तोंडात अन्नाचा घास घालणाऱ्या या उपक्रमाबरोबरच आता गरजूंसाठी औषधोपचाराची सोय करण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. याची सुरुवात शनिवारी गुढी पाडव्यादिवशी होत आहे.
कै. अनंतराव गोंविदराव कोरगावकर ट्रस्टतर्फे शिरोली येथील कोरगाव पेट्रोलपंपावर गेली ६३ वर्षे समाजसेवेचा झरा वाहत आहे. देशातील उच्चांकी पेट्रोल विक्री असणाºया पेट्रोलपंपापैकी एक असणाºया या पंपाच्या निव्वळ नफ्यातील २५ टक्के वाटा दुर्बल घटकांसाठी खर्च करण्याचे धोरण कोरगावकर कुटूंबियांची तिसरी पिढीही तितक्याच आत्मीयतेने जपत आहे. वृध्दाश्रम, अनाथाश्रम, मतिमंद, अंध यांना मदतीसासठी मोफत अॅम्ब्युलन्स, नैसर्गिक आपत्तीवेळी मदत, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य क्षेत्रांना मदत, वृक्षारोपणासाठी मदत, वारकाऱ्यांची, दुष्काळग्रस्तांना पाणी अशा विविध उपक्रमातून कोरगावकर कुटूंबियांनी आपला सामाजिक जाणिवा प्रगल्भ असल्याची प्रचिती दरवेळी दिली आहे.