खुरट्या झुडपांत कोमेजले निसर्ग केंद्र
By admin | Published: October 19, 2016 12:42 AM2016-10-19T00:42:55+5:302016-10-19T00:42:55+5:30
रंकाळा संवर्धन बनला दिखावाच : प्रशिक्षण केंद्र इमारतीची दुरवस्था; पैशांचा चुराडा
तानाजी पोवार --कोल्हापूर -रंकाळा संवर्धनाचाच एक भाग म्हणून तलाव परिसरातील निसर्गाच्या कुशीत उभा केलेले निसर्ग माहिती व प्रशिक्षण केंद्र हे वाढलेल्या ‘खुरट्या निसर्गाच्या झुडपांत’ सध्या मुजले आहे. निसर्गाची माहिती देण्यासाठी सुमारे ३५ लाख रुपये खर्च करून उभारलेल्या या केंद्राची प्रशस्त इमारत अडगळीत पडली असून, हे प्रशिक्षण नव्हे तर गैरकृत्यांचे केंद्रच बनली आहे.
रंकाळा तलावाच्या पश्चिमेस व क्रशर खणीच्या पिछाडीस असणाऱ्या मार्गावर अत्यंत गर्द झाडीत महापालिकेची निसर्ग माहिती व प्रशिक्षण केंद्राची प्रशस्त इमारत लपली आहे. अत्यत सुंदर डिझाईनमध्ये अर्धचंद्रकोरच्या आकारात चार हॉलची इमारत असून, या त्याच्या संरक्षणासाठी स्वतंत्र पहारेकरी कक्ष व स्वच्छतागृहाचीही सोय केली आहे. रंकाळा तलावाच्या निसर्गरम्य वातावरणात निसर्गाच्या कुशीत ही इमारत डौलाने उभी असली तरीही महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या इमारतीचा वापर सध्या गैरकृत्यांसाठी होत आहे.
केंद्राच्या पर्यावरण व वनविभागांतर्गत राष्ट्रीय सरोवर व संवर्धन योजनेचा भाग म्हणून रंकाळा तलाव पर्यावरणाची जपणूक करण्यासाठी २००६ मध्ये केंद्र सरकारकडून सुमारे आठ कोटी ६५ लाखांचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानंतर २००९ च्या सुधारित मंजूर प्रस्तावात १५ वेगवेगळ्या प्रकारची नियोजित कामे होती. हा प्रस्ताव परिपूर्ण करून निधी खर्च पडण्यासाठी केंद्राने काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली, त्यामध्ये तलावात मिसळणारे नाले आडविणे, तलावातील गाळ काढणे, आदी कामांबरोबरच रंकाळा तलावाचे संवर्धन व जनजागृतीसाठी निसर्ग माहिती व प्रशिक्षण केंद्र उभारण्याची आवश्यकता होती. त्यानुसार २००९ मध्ये क्रशर खणीनजीकच्या जागेत सुमारे ३५ लाख रुपये खर्च करून अत्यंत देखणी अशी अर्धचंद्रकार आकारात प्रशस्त इमारत उभा केली. तसेच या इमारतीसमोर वृक्षारोपणही केले होते; पण अत्यंत रम्य वातावरणात ही इमारत सध्या अडगळीत झाली आहे. इमारतीच्या खिडकीे, कंपौंड वॉल यामध्ये, तसेच समोर खुरट्या झाडांची गर्दी झाली आहे. त्यामुळे या इमारतीतच ‘निसर्ग’ उगवला आहे.
गैरकृत्यांचे केंद्र
ही इमारत रस्त्यापासून सुमारे १५ फूट खाली रंकाळा खणीच्या समान अंतरावर आहे. संपूर्ण इमारत गेली अनेक वर्षे बंद स्थितीत असल्याने इमारतीला खुरट्या झुडपांनी वेढले आहे. इमारतीपर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने मळलेल्या पायवाटेवरूनच जावे लागते. या इमारतीमध्ये प्रेमीयुगुलांव्यतिरिक्त कोणीही फिरकत नसल्याची परिस्थिती आहे. तसेच रात्रीच्यावेळी हा परिसर पूर्णत: अंधारात असल्याने ही इमारत गैरकृत्यांचे केंद्र बनली आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा दिखावा
या इमारतीच्या मुख्य दरवाजावर ‘आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणात आहात’ असा कागद चिकटविलेला फलक आहे; पण या इमारतीबाहेर कुठेही सीसीटीव्ही कॅमेरा दिसत. कदाचित गैरकृत्य करणाऱ्या प्रेमीयुगुलांना बिथरविण्यासाठी हा दिखाव्याचा फलक असावा.
३५ लाख रुपये पाण्यात
परिसरातील पर्यावरणाचे संरक्षण, सरपटणाऱ्या प्राण्यांची माहिती देणारे केंद्र उभारणीसाठी केंद्राकडून आलेल्या निधीतील ३५ लाख रुपये खर्च करून इमारत उभारली होती; पण त्याचा वापर गेल्या सात वर्षांत कधीही झालाच नाही.