कोथळीचा आयुर्वेदिक दवाखाना सलाईनवर

By admin | Published: October 12, 2015 10:49 PM2015-10-12T22:49:30+5:302015-10-13T00:27:08+5:30

रिक्त पदे भरण्याची गरज : दवाखाना गेल्या तीन महिन्यांपासून बंद, जिल्हा परिषदेने लक्ष देण्याची गरज

Kothali Ayurvedic dispensary on saline | कोथळीचा आयुर्वेदिक दवाखाना सलाईनवर

कोथळीचा आयुर्वेदिक दवाखाना सलाईनवर

Next

संतोष बामणे - जयसिंगपूर -शिरोळ तालुक्यामध्ये कोथळी व घोसरवाड या दोन ठिकाणी आयुर्वेदिक दवाखाने असून कोथळी (ता. शिरोळ ) येथील दवाखाना गेल्या तीन महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. या दवाखान्याला वाली कोण आहे का, असा सवाल नागरिक करीत आहेत. ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी अवस्था झाली आहे.
कोथळी (ता. शिरोळ) गावाची लोकसंख्या बारा हजारांवर असून गावामध्ये सध्या दानोळी प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत उपकेंद्र आहे. महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद आयुर्वेदिक दवाखान्यांची सोय काही ठिकाणी केली आहे. त्यातील शिरोळ तालुक्यामध्ये घोसरवाड व कोथळी या ठिकाणी दोन आयुर्वेदिक दवाखान्यांची सोय केली आहे. या ठिकाणी सुसज्ज अशी दवाखान्यांची इमारत आहे. मात्र, डॉक्टराविना दवाखाने ओस पडले आहेत.
कोथळी येथील दवाखान्यात डॉ. बी. सी. लांब यांची नियुक्ती केली आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपूर्वी चंदगड तालुक्यातील कोवाड येथील आरोग्य केंद्राचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपविल्यामुळे ते कधीपर्यंत तेथे थांबतील याची शाश्वती नाही.
दानोळी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत कोथळी येथे आयुर्वेदिक उपकेंद्र आहे. याचा लाभ कोथळीसह परिसरातील रुग्णांना मिळत होता. मात्र, काही महिन्यांपासून या दवाखान्याला वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
परिसरात वीटभट्टी व्यावसायिक आहेत. यामुळे परराज्यांतून अनेक कामगार याठिकाणी येत असतात. त्यांना आरोग्य सेवा घेण्यासाठी जयसिंगपूर किंवा सांगलीला जावे लागते. तसेच गावातील नागरिकांनाही खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे. येथील दवाखान्यात आरोग्य सेवक उपलब्ध होता. त्यालाही दानोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून घेतले आहे. या प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधींनी आवाज उठविण्याची गरज असून जिल्हा परिषदेनेही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.


येथील आयुर्वेदिक दवाखाना गेल्या चार महिन्यांपासून डॉक्टर नसल्यामुळे बंद आहे. याबाबत गुरूवारी (दि. ८) जिल्हा परिषद सदस्य सुरेश कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांची
बैठक झाली. यावेळी
कांबळे यांनी लवकरच डॉक्टर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले असल्याची माहिती सरपंच सुप्रभा इंगळे यांनी दिली.


गेल्या काही महिन्यांपासून हा दवाखाना बंद असल्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. त्यातच परिसरात स्वाइन फ्लूची साथ आल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोथळी येथील बंद असलेला दवाखाना लवकरात लवकर सुरू करून दिलासा देण्याची गरज आहे.
- रशिद जमादार,
ग्रामस्थ कोथळी

Web Title: Kothali Ayurvedic dispensary on saline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.