कोल्हापूर शहरात आज कोवॅक्सिन, उद्या कोविशिल्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:16 AM2021-07-12T04:16:36+5:302021-07-12T04:16:36+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनातर्फे लसीकरणाचा पुढील टप्पा आज, सोमवारपासून सुरू होत असून सावित्रीबाई फुले केंद्र वगळता सर्वच केंद्रावर कोवॅक्सिनचा ...
कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनातर्फे लसीकरणाचा पुढील टप्पा आज, सोमवारपासून सुरू होत असून सावित्रीबाई फुले केंद्र वगळता सर्वच केंद्रावर कोवॅक्सिनचा पहिला डोस तर मंगळवारी केवळ कोविशिल्डचा दुसरा डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लस घेण्यासाठी होणारा गोंधळ, वादावादी लक्षात घेऊन केंद्रावरूनच संबंधित नागरिकांना फोन केले जाणार आहेत.
रविवारी लसीकरण झाले नाही. जशी लस उपलब्ध होईल तसी ती नागरिकांना दिली जात असून मागणी व पुरवठा यात मोठी तफावत राहत असल्याने प्रत्यक्ष लसीकरणावेळी गोंधळ होत आहे. परंतु हा गोंधळ टाळून ही प्रक्रिया सुलभ व सुरळीत व्हावी यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. आज सोमवारी ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे, अशांना कोवॅक्सिनचा पहिला डोस दिला जाणार आहे. तर सावित्रीबाई फुले रुग्णालयातील केंद्रावर फक्त दिव्यांग व परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे.
महापालिका प्रशासनास कोविशिल्डचे सुमारे सहा हजार डोस प्राप्त झाले आहेत. मंगळवारपासून कोविशिल्डचे लसीकरण सुरू होईल. परंतु त्यासाठी नागरिकांना फोन केले जाणार आहेत. ज्यांना फोन येतील, त्यांनीच केंद्रावर जायचे आहे. तसेच ज्यांनी पहिला डोस ज्या केंद्रावर घेतला आहे, त्यांना दुसरा डोससुद्धा त्याच केंद्रावर घ्यायचा आहे. दुसरा डोस अन्यत्र केंद्रावर दिला जाणार नाही, असे उपायुक्त निखिल मोरे यांनी सांगितले.