शिवाजी विद्यापीठातील वसतिगृहांमध्ये पुन्हा कोविड सेंटर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:24 AM2021-04-08T04:24:25+5:302021-04-08T04:24:25+5:30
गेल्यावर्षी कोरोना केअर सेंटरसह संस्थात्मक अलगीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने विद्यापीठातील चार वसतिगृहे ताब्यात घेतली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू ...
गेल्यावर्षी कोरोना केअर सेंटरसह संस्थात्मक अलगीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने विद्यापीठातील चार वसतिगृहे ताब्यात घेतली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. रूग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे पुढील दक्षता आणि तयारी म्हणून जिल्हा प्रशासनाने तंत्रज्ञान अधिविभागासह मुलांचे वसतिगृह ताब्यात घेण्यात येतील, असे विद्यापीठ प्रशासनाला कळविले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने तोंडी सूचना दिली असल्याचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी बुधवारी सांगितले. दरम्यान, कृषी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये पहाटे पाच ते सकाळी नऊ आणि सायंकाळी पाच ते रात्री आठ यावेळेत नागरिक फिरायला येतात. महाविद्यालयातील खेळाच्या मैदानावर ते प्रवेश करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धांच्या सराव करताना अडथळा निर्माण होतो. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महाविद्यालयात फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या वर्दळीचे प्रमाण जास्त आहे. त्यामध्ये कोरोनाबाबतच्या नियमांचा भंग होत आहे. महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविद्यालय परिसरात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण करणे आवश्यक आहे. त्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ कार्यवाही व्हावी, या मागणीचे पत्र प्रशासनाला दिले असल्याची माहिती कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता एस. आर. शिंदे यांनी दिली.
चौकट
विद्यापीठात फिरायला येणाऱ्यांना सूचना
विद्यापीठात सकाळी, सायंकाळी फिरायला येण्याबाबत सध्या बंदी घातलेली नाही. कोरोना नियमांचे पालन या नागरिकांनी करावे, अशी सूचना त्यांना केली. याबाबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे डॉ. नांदवडेकर यांनी सांगितले.