आगरमध्ये पुन्हा कोविड सेंटर सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:24 AM2021-04-24T04:24:09+5:302021-04-24T04:24:09+5:30
शिरोळ : स्वॅब संकलन व लसीकरण एकाच छताखाली सुरू असल्याने कोरोना संक्रमणाचा धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर आरोग्य ...
शिरोळ : स्वॅब संकलन व लसीकरण एकाच छताखाली सुरू असल्याने कोरोना संक्रमणाचा धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेकडून शिरोळ-आगर रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या इमारतीत पूर्वीप्रमाणे येत्या दोन दिवसांत कोविड केअर सेंटर सुरू होणार आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांची तसेच कोरोनाची लक्षणे आढळून येत असलेल्या नागरिकांचे स्वॅब संकलन शिरोळ ग्रामीण रुग्णालयात केले जात आहे. जवळच ४५ वर्षांवरील तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाची सुविधा करण्यात आली आहे. एकाच ठिकाणी नागरिकांच्या रांगा, उपस्थिती, संपर्क धोकादायक ठरत असल्याने 'लोकमत'ने वृत्त प्रसिध्द करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. शिवाय ग्रामीण रुग्णालयातील तिघांचा पॉझिटिव्ह अहवाल आल्याने खळबळ उडाली होती. सामाजिक संघटनांनी पूर्वीप्रमाणे आगर अथवा अन्य ठिकाणी स्वॅब संकलन कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आगर येथे डॉ. आंबेडकर कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असून, याठिकाणी स्वच्छतेचे काम युध्दपातळीवर सुरू आहे, अशी माहिती तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे व आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद दातार यांनी दिली.
चौकट - केंद्रशाळेत लसीकरण
ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे लसीकरणासाठी योग्य नियोजन असावे, या पार्श्वभूमीवर रुग्णालयाशेजारी असणाऱ्या केंद्र शाळेजवळ शुक्रवारपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
फोटो - २३०४२०२१-जेएवाय-०४-लोकमत वृत्त