घोडावत विद्यापीठात पुन्हा कोविड रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:37 AM2021-05-05T04:37:42+5:302021-05-05T04:37:42+5:30
कोल्हापूर: गतवर्षी कोरोनाच्या संकटामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी आधार ठरलेल्या संजय घोडावत विद्यापीठात ...
कोल्हापूर: गतवर्षी कोरोनाच्या संकटामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी आधार ठरलेल्या संजय घोडावत विद्यापीठात पुन्हा कोविड रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय साळे यांनी सोमवारी विद्यापीठाला भेट देऊन प्राथमिक सूचना केल्या.
गेल्या वर्षी कोरोनाचा कहर वाढल्यानंतर हजारो पॉझिटिव्ह आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांवर या ठिकाणी उपचार करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या कोविड रुग्णालयाचा जिल्ह्याला आधार ठरला होता. अगदी परजिल्ह्यातील रुग्णांनासुद्धा या ठिकाणी दाखल करण्यात आले होते. डॉ. उत्तम मदने यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम सुरू होते.
मात्र गेल्या ऑक्टोबरनंतर कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर येथील सर्व वैद्यकीय साहित्य कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात आणून ठेवले गेले. विद्यापीठाचे कामकाज सुरू करण्यासाठी म्हणून या ठिकाणी बसवलेल्या ऑक्सिजनच्या पाईपलाईनही काढण्यात आल्या. दरम्यान, या ठिकाणी झालेली मोडतोड विद्यापीठाने दुरुस्त करून घेतली. येथील दुरुस्ती, वीज बिलाचा आलेला खर्च मिळावा यासाठी जिल्हा परिषदेकडे विद्यापीठ प्रशासनाने मागणी केली होती. अजून त्यावर निर्णय झालेला नाही.
मात्र या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्ण वाढत असल्याने पुन्हा विद्यापीठात कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला संजय घोडावत यांनीही मान्यता दिल्याने सोमवारपासूनच या ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
चौकट
९० ऑक्सिजन बेडची सोय
या ठिकाणी पहिल्या टप्प्यात ३५० खाटांची व्यवस्था करण्यात येणार असून यातील ९० खाटांमध्ये ऑक्सिजनची सोय असणाऱ्या राहणार आहेत. त्यानुसार पुन्हा ऑक्सिजन पाईपलाईनचे काम ही सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.