आवश्यकता भासेल तशी कोविड केंद्रे सुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:24 AM2021-04-21T04:24:31+5:302021-04-21T04:24:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाची साथ रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध पातळीवर प्रयत्न करीत असल्याचे प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाची साथ रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध पातळीवर प्रयत्न करीत असल्याचे प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आवश्यकता भासेल तसे कोविड केअर सेंटर्स सुरू केली जाणार असून, तेथे डॉक्टर्स, कर्मचारी नेमणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले.
महानगरपालिका आयसोलेशन रुग्णालयात सध्या कोरोनाचे ७० रुग्ण उपचार घेत असून, ही क्षमता २०० बेडपर्यंत वाढविली जाणार आहे. शिवाजी विद्यापीठातील डीओटी येथे ३५० क्षमतेचे कोविड केअर सेंटर सुरू केले असून, तेथे २३१ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यानंतर वसतिगृहाच्या तीन इमारतींत ५०० बेडचे सेंटर सुरू केले जाईल. जैन बोर्डिंग, राजोपाध्ये येथील सेंटर सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे बलकवडे यांनी सांगितले.
शहरात १८८ कंटेन्मेंट झोन -
कोल्हापूर शहरात रोज रुग्ण वाढत आहेत. ६७६ रुग्ण सध्या घरातच उपचार घेत असल्याने संपूर्ण शहरात १८८ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. त्याठिकाणी ४४ शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या असून, त्या त्या क्षेत्रातील परिस्थितीवर त्यांना लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात ९१८६ घरातील ३५ हजार लोकांमधून ४९१६ व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले. त्यातून ३८५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या.
शहरातील हॉटस्पॉट
शहरातील यादवनगर, फुलेवाडी रिंगरोड, कसबा बावडा, अयोध्या कॉलनी, अयोध्या पार्क, राजारामपुरी, मातंग वसाहत, महाडिक वसाहत, रुईकर कॉलनी, मोरे, मानेनगर या भागात जास्त संख्येने रुग्ण आढळून आल्याने हॉटस्पॉट ठरले आहेत.
साठ वर्षांवरील, पंधरा वर्षांखालील रुग्ण-
शहरात वेगवेगळ्या ठिकाणी साठ वर्षांवरील, तसेच पंधरा वर्षांखालील मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिनाभरात साठ वर्षांवरील १३७ जणांना, तर पंधरा वर्षांखालील ५२ मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे बलकवडे यांनी सांगितले. त्यामुळे ज्येष्ठांनी, तसेच मुलांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
डॉक्टर्स भरती प्रक्रिया सुरू-
कोविड केअर सेंटरसाठी डॉक्टर्स, नर्स, तसेच अन्य कर्मचारी नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण ४३२ कर्मचारी नेमले जाणार असून, ७१ कर्मचारी नियुक्त झाले आहेत. दोन दिवसांत २६४ जागा भरल्या जातील, असे बलकवडे यांनी सांगितले.