VIDEO : 'कोवाड'ची बाजारपेठ चार दिवस पाण्यात!, 2 कोटींची उलाढाल ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 03:06 PM2019-08-07T15:06:27+5:302019-08-07T15:08:57+5:30
पावसामुळे चार दिवसांपासून गावातील पाणी, वीज व दूरध्वनी सेवाही खंडित झाली आहे.
- राम मगदूम
गडहिंग्लज : कोवाड (ता.चंदगड) येथील संपूर्ण बाजारपेठ चार दिवसांपासून पाण्यात आहे. त्यामुळे सुमारे 2 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. शेकडो नागरिक ताम्रपर्णी नदीच्या महापूराने वेढलेल्या घरात अडकले आहेत.
ताम्रपर्णी नदीच्या काठावर वसलेले 'कोवाड'गाव स्वामीकार रणजीत देसाई यांच्यामुळे सर्वत्र परिचित झाले. ताम्रपर्णी नदीच्या पलीकडे बेळगाव मार्गावरील किणी गावच्या हद्दीत आणि अलीकडे पश्चिम बाजूच्या निट्टूर मार्गावर काही व्यापाऱ्यांनी शेतवडीत घरे बांधली आहेत. त्यांनी तळमजल्यावर दुकाने आणि वरील मजल्यावर निवासाची सोय केली आहे.
मात्र, शनिवारी नदी पात्राबाहेर पडलेले पाणी शेतवडीतील या दुकानातही शिरले असून वरच्या मजल्यावरील नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. त्यापैकी १५ महिला व १६ पुरुष मिळून ३१ जणांना आणि एका कुत्र्याला सोमवारी (दि.5) गडहिंग्लज नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने यांत्रिक बोटीने सुरक्षित ठिकाणी हलविले. परंतु, अजूनही शेकडो नागरिक घरातच अडकले आहेत.
पावसामुळे चार दिवसांपासून गावातील पाणी, वीज व दूरध्वनी सेवाही खंडित झाली आहे. त्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत.
भांड्याची केली डोली..!
गडहिंग्लज विभागात केवळ गडहिंग्लज नगरपालिकेकडेच एकच यांत्रिक बोट उपलब्ध आहे. परंतु, ती देखील गडहिंग्लजमध्ये हिरण्यकेशी नदीच्या महापूरात अडकलेल्यांच्या बचाव मोहिमेत व्यस्त राहिल्याने कोवाडच्या काही धाडसी तरूणांनी मोठे भांडे दोरखंडात अडकून त्यातून एक महिला व लहान मुलाला पुराच्या पाण्यातून सुखरूप सुरक्षित स्थळी हलविले.