के.पी.पाटील येत्या चार दिवसात निर्णय घेणार, मुश्रीफांना पाठिंबा देणार?; कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 04:56 PM2023-07-04T16:56:18+5:302023-07-04T16:56:39+5:30
राज्यातील राजकीय उलथापालथ राधानगरी विधानसभेच्या मुळावर उठली
शिवाजी सावंत
गारगोटी: राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार के.पी.पाटील यांनी मतदारसंघातील राजकीय अडचणी पाहून कोणत्या गटात जायचे हा निर्णय तूर्त स्थगित केला असून येत्या चार दिवसात जाहीर करणार असल्याचे आजच्या मुदाळ येथील बैठकीत जाहीर केले. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता सारीपटात त्यांच्या राजकीय कारकीर्दीची गोची झाली आहे. त्यांची स्थिती "इकडे आड तिकडे विहीर" अशी झाली आहे. तर सामान्य कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
के. पी. पाटील यांनी आपल्या गटाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत दबक्या आवाजात वेगवेगळे सुर उमटत होते.कोणता निर्णय घ्यावा हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर आहे.त्यांचे जवळचे मित्र मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबत जावे तर बिद्री साखर कारखान्याच्या सत्तेचे विकेंद्रीकरण होऊ शकते. कारण अगोदरच ए. वाय. पाटील यांचा स्नेह अजित पवार यांच्याशी असल्याने त्यांचा कल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री मुश्रीफ यांच्या सोबत जाण्याचा आहे. के. पी. पाटील यांनी जर त्यांच्या सोबत न जाण्याचा प्रयत्न केला तर राधानगरी तालुक्यातील सभासद आणि मतदार या दोन्हींना मुकण्याची भीती आहे.
के.पी. पाटील यांच्या समोर सद्या बिद्री कारखान्याची निवडणूक असल्याने त्यांची गोची झाली आहे. चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्यात सत्ता मिळविण्यासाठी हसन मुश्रीफ यांच्या सोबत आणखी एखाद्या गटाची म्हणजेच समरजित घाटगे किंवा माजी आमदार संजय घाटगे यातील एका गटाची साथ आवश्यक असते. यांना वगळून कारखान्यावर सत्ता मिळवता येत नाही. ए वाय पाटील यांची नाराजी आताच दूर केली होती तोपर्यंत ही राजकीय उलथापालथी झाल्याने त्यांच्या गटाचे धाबे दणाणले.
विधानसभेला अडचण
मुश्रीफ यांच्या सोबत गेल्यास कारखाना मिळेल पण विधानसभेला पुन्हा अडचण? प्रकाश आबिटकर हे विद्यमान आमदार असल्याने त्यांना पक्षाने तिकीट दिल्यास आघडीचा धर्म पाळण्यासाठी त्यांना त्यांचा प्रचार करावा लागेल किंवा गप्प बसावे लागेल. के.पी पाटील यांच्या समोर विधानसभा निवडणुक कशी लढायची? हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. ही राजकीय उलथापालथी राधानगरी विधानसभेच्या मुळावर उठली आहे.
कार्यकर्ते, पदाधिकारी एकनिष्ठ राहतील?
आगामी काळात राजकारण रंगतदार होणार आहे. नेते पळत सुटल्याने उद्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी कितपत पक्षाशी एकनिष्ठ राहतील? हा मोठा प्रश्न आहे.