राधानगरीतून के.पी.च : ‘ए. वाय.’ यांना विधानपरिषद, ‘बिद्री’ चे अध्यक्षपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 01:10 AM2019-10-02T01:10:05+5:302019-10-02T01:10:54+5:30
आज, बुधवारी आमदार हसन मुश्रीफ करणार आहेत. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना थांबविण्यात आले असून त्यांना ‘बिद्री’च्या अध्यक्षपदाबरोबरच विधान परिषदेवर संधी देण्याचा शब्द पक्षाध्यक्ष पवार यांनी दिला आहे.
कोल्हापूर : राधानगरी मतदारसंघातील उमेदवारीवरून मेहुण्या-पाहुण्यांत निर्माण झालेला गुंता मंगळवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर इस्लामपूरमध्ये सुटला. माजी आमदार के. पी. पाटील यांनाच उमेदवारी देण्याचा राष्ट्रवादीचा निर्णय झाला असून, त्याची अधिकृत घोषणा आज, बुधवारी आमदार हसन मुश्रीफ करणार आहेत. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना थांबविण्यात आले असून त्यांना ‘बिद्री’च्या अध्यक्षपदाबरोबरच विधान परिषदेवर संधी देण्याचा शब्द पक्षाध्यक्ष पवार यांनी दिला आहे.
के. पी. व ए. वाय. यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू होती. मध्यंतरी पक्षाध्यक्ष शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले असता, चर्चा करून ‘बिद्री’ कारखान्याचे अध्यक्षपद देण्याची सूचना त्यांनी मुश्रीफ यांना केली होती; पण ज्या काही तडजोडी करायच्या, त्या पवार यांच्यासमोरच करूया, अशी भूमिका ए. वाय. यांनी घेतल्याने मंगळवारी पाटील यांच्यासह मुश्रीफ, के. पी. पाटील यांनी इस्लामपुरात पवार यांची भेट घेतली.
के.पीं.ची ए. वाय. यांच्या निवासस्थानी भेट
मंगळवारी सायंकाळी सात वाजता के. पी. पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह ए. वाय. यांच्या भेटीसाठी सोळांकुरात आले; परंतु सोळांकुर गावातील युवकांनी ए. वाय. यांची उमेदवारी रोखण्याच्या निषेधार्थ तीव्र भावना व्यक्त केल्या. या तरुणांना सरपंच आर. वाय. पाटील यांनी प्रबोधन करून शांत करण्याचा प्रयत्न केला. ए. वाय. पाटील यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना उद्या एकत्र करून प्रचाराची रणनीती ठरविणार आहेत. एक तास चाललेल्या चर्चेत शरद पवार यांच्या सभेचे आगमनाची तसेच विविध प्रचार मुद्द्यांवर चर्चा झाली. सर्व कार्यकर्त्यांना संघटित करून मेळावा घेण्याचे नियोजन या बैठकीत झाले.
पक्षाध्यक्ष शरद पवार व आमदार हसन मुश्रीफ यांचा शब्द प्रमाण मानून पक्ष देईल ती जबाबदारी निष्ठेने पार पाडणार आहे. निवडणूक लढवायचीच अशी भावना कार्यकर्त्यांची असल्याने त्यांची समजूत काढून कामाला लावावे लागेल. - ए. वाय. पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्टवादी कॉँग्रेस