कृष्णा, पंचगंगा प्रदूषणप्रश्नी शिरोळकरांचे ‘शंखध्वनी’
By Admin | Published: December 29, 2015 12:57 AM2015-12-29T00:57:23+5:302015-12-29T01:03:14+5:30
दूषित पाण्याच्या बाटल्यांचे तोरण : लाक्षणिक धरणे आणि ठिय्या आंदोलन
कोल्हापूर : कृष्णा व पंचगंगा नदीकाठाशेजारील गावांतील शेतकरी दूषित पाण्याच्या विषाने दररोज मरणयातना भोगतो आहे. त्याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिरोळसह आसपासच्या गावांतील ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शंखध्वनी करत एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन व ठिय्या आंदोलन केले. यावेळी दूषित पाण्याच्या बाटल्यांचे तोरणही कार्यालयाच्या गेटला बांधले.
कृष्णा व पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांना रोज या दूषित पाण्याच्या विषाने मरणयातना भोगाव्या लागत आहे. या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी दुपारी बाराच्या सुमारास शिरोळ ग्रामपंचायत सदस्य प्रसाद धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना देण्यात आले. आंदोलनात संजय माळी, सुभाष कोळी-कुटवाडे, वसंतराव कोळी, मन्सूर मुजावर, सुनील कोळी, दिलावर मुजावर, अशोक कोळी, महावीर कोकणे, अण्णाप्पा राजमाने, रवींद्र महापुरे, शकुंतला महात्मे, शांताबाई शेट्टी, सुशीला चुडमुंगे, अंजना देशमुख, भाग्यश्री गावडे सहभागी होते. (प्रतिनिधी)
आंदोलकांची फलकासह घोषणाबाजी
यावेळी आंदोलकांच्या हातात ‘गंगा पॅटर्नप्रमाणे कृष्णा-पंचगंगेचे धोरण राबवा...’, ‘जलसंपत्ती ही राष्ट्रीय संपत्ती...’, ‘पाणी वाचवा...देश वाचवा...’, ‘आपत्तीग्रस्त म्हणून सवलती द्या...’ ‘शुद्ध पाणी हा माझा जन्मसिद्ध हा हक्क आहे, तो मी मिळविणारच...’असे फलक दिसत होते. समोर दूषित पाण्याने भरलेल्या पाण्याच्या बाटल्यांचे तोरण ठेवण्यात आले होते.