‘कृष्णा’च्या आरोपींचा जामीन फेटाळला !
By admin | Published: April 21, 2017 09:47 PM2017-04-21T21:47:32+5:302017-04-21T21:47:32+5:30
आर्थिक गुन्ह्यात जामीन नको, सरकारी युक्तिवाद
कऱ्हाड : कृष्णा कारखान्यातील बोगस कर्जप्रकरणी अटकेत असणाऱ्या माजी संचालकांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी येथील प्रथमवर्ग न्या. एस. एम. पाडोळीकर यांच्यासमोर सुनावणी झाली. आर्थिक गुन्ह्यातील संशयितांची जामिनावर मुक्तता करू नये, असा युक्तिवाद यावेळी सरकार पक्षाच्या वतीने करण्यात आला. त्यानुसार न्यायालयाने नऊ माजी संचालकांचा जामीन नाकारला.
तत्कालीन कार्यकारी संचालक अशोक श्रीरंग नलवडे (रा. मंगळवेढा), अशोक मारुती जगताप (५५, रा. वडगाव हवेली), सर्जेराव रघुनाथ लोकरे (५२, रा. येरवळे, ता. कऱ्हाड), संभाजी रामचंद्र जगताप (७३, कोडोली, ता. कऱ्हाड), बाळासाहेब दामोदर निकम (६९, रा. शेरे, ता. कऱ्हाड), उदयसिंह प्रतापराव शिंदे (५०, रा. बोरगाव), वसंत सीताराम पाटील (६८, रा. नेर्ले, ता. वाळवा), महेंद्र ज्ञानू मोहिते (५६, रा. वाटेगाव, ता. वाळवा), चंद्रकांत विठ्ठल भुसारी (रा. टेंभू, ता. कऱ्हाड) अशी जामीन फेटाळलेल्यांची नावे आहेत.
कृष्णा कारखान्यातील बोगस कर्ज प्रकरणाच्या आरोपावरून यापूर्वीच माजी अध्यक्ष
अविनाश मोहिते व उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
कारखाना, संघ व बँकेकडून फसवणूक
बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून संशयितांनी वाहतूक कंत्राटदारांच्या नावे बोगस कर्ज काढले आहे. कर्जाची रक्कम संघाच्या नावावर वर्ग करण्यात आली. ती संपूर्ण रक्कम २०१३-१४ च्या पूर्वीच्या कर्जास वर्ग करून ती खाती बंद केली. त्यामुळे कारखाना, संघ व बँक यांनी स्वत:च्या फायद्यासाठी ७८४ कंत्राटदारांचे आर्थिक नुकसान व फसवणूक केल्याचा युक्तिवाद सरकार पक्षाचे वकील अॅड. नागनाथ गुंडे यांनी केला.