‘आघाडीचं घोडं’ शेवटपर्यंत कृष्णेत न्हालंच नाही

By admin | Published: February 6, 2017 11:27 PM2017-02-06T23:27:13+5:302017-02-06T23:27:13+5:30

कऱ्हाड दक्षिण : काँगे्रस, राष्ट्रवादीने भरलेत स्वतंत्र अर्ज, उमेदवारांना दिले एबी फॉर्म

Krishna's heart does not end till the end of the 'horse race' | ‘आघाडीचं घोडं’ शेवटपर्यंत कृष्णेत न्हालंच नाही

‘आघाडीचं घोडं’ शेवटपर्यंत कृष्णेत न्हालंच नाही

Next

प्रमोद सुकरे ---कऱ्हाड --जिल्ह्यात कुठे नव्हे ती कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, गेले पंधरा दिवस चर्चेभोवती फिरणारे ‘आघाडीचं घोडं’ अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही ‘कृष्णेत’ न्ह्याल्याचं पाहायला मिळालं नाही.
दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी ओढून ताणून का होईना सर्व जागांवर एबी फॉर्मसहीत उमेदवार उभे करण्याचा खटाटोप केला. त्यामुळे कार्यकर्त्यांची मनेही कलुषित झाली असून, दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचं दक्षिणेत ‘जुळता जुळेना’ अशीच चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.
कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघात काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी करण्यात दोन्ही काँग्रेस नेत्यांना सुरुवातीपासूनच रस दिसत होता. गत महिनाभरातील राजकीय घडामोडी आणि उलथापालथी पाहता दोन्ही काँग्रेसना आघाडी करण्याची गरजही निर्माण झाली होती. त्यामुळे जिल्ह्यात कुठे नव्हे ती कऱ्हाड दक्षिणेत दोन्ही काँग्रेसची आघाडी पाहायला मिळेल, असे तालुक्यात बोलले जात होते.
राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांबरोबरच बारामतीच्या ‘दादा’ मंडळींनीही याला ग्रीन सिग्नल दिला होता. कऱ्हाडचे पृथ्वीबाबाही ‘हात’ दाखवून अवलक्षण नको या भूमिकेतून आपण आघाडीला सकारात्मक असल्याचे सांगत होते.
मुंबई दिल्लीच्या राजकारणात अडकलेल्या बाबांनी आघाडीच्या बैठकीबाबतची चर्चा करण्याची जबाबदारी आपल्या ‘लाडक्या नानांवर’ टाकली. रेठरेकर दादा, वाठारकर आबा आणि उंडाळकर भाऊंच्याबरोबर विजयनगरच्या नानांनी काही बैठकाही केल्या. त्यातून ना काही रस निघाला, ना कोणी कस लावला. सोमवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने रविवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरूच होती. त्यामुळे सोमवारी अर्ज दाखल करताना सर्वकाही अलबेल असेल असे कार्यकर्त्यांना वाटत होते.
प्रत्यक्षात मात्र रात्रभर कार्यकर्त्यांना वेगळीच फोनाफोनी झाली. सकाळी उठल्यापासून कार्यकर्त्यांची दाखले गोळा करण्याची गडबड पाहायला मिळाली आणि अर्ज दाखल करायला सुरुवात केल्यावर दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र अर्ज दाखल केल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे दक्षिणेतही काँगे्रस राष्ट्रवादी आमने-सामने लढणार का? याचे ‘उत्तर’ राष्ट्रवादीच्या कऱ्हाडातील आमदारांनाच माहीत.

दोन्ही अध्यक्षांचं झालंय कोडं
कोळे गणातून राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता पाटील दोघेही इच्छुक आहेत. सोमवारी या दोघांनीही स्वतंत्र अर्ज भरले आहेत. आता कोळे गणाचा विषय मिटविताना कोणत्या अध्यक्षाला उभे करायचे आणि कोणत्या अध्यक्षाला खाली बसवायचे हा दोन्ही काँग्रेस नेत्यांसमोरील प्रश्न सोडवायचा झाल्यास कसा सोडविला जाईल, याचीही चर्चा सुरू आहे.


....म्हणे अजूनही आशा आहे
अर्ज मागे घेण्याची अजूनही मुदत आहे. तोपर्यंतही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा होऊ शकते. ऐनवेळी वाटाघाटी पूर्ण होऊन निवडणूक आघाडीच्या माध्यमातूनच लढविली जाऊ शकते, अशी आशा दोन्ही काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उराशी बाळगून आहेत. त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरू नये याची काळजी आता नेत्यांनीच घेतलेली बरी.
एबी फॉर्म म्हणजे काय रं भाऊ?
सोमवारी दिवसभर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली होती. त्यानंतर पक्षाचा एबी फॉर्म कोणाला मिळणार याची चर्चा आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली. अनेकजण एबी फॉर्म म्हणजे काय रं भाऊ?, असे विचारताना दिसत होते. इच्छुक उमेदवार आमचे नेते एबी फॉर्म पाठवून देणार आहेत, याची वाट पाहत बसले होते. प्रत्यक्षात हे नेते एबी फॉर्म घेऊन आले. त्यांनी ते सुपूर्द केले. मात्र, नेत्यांनी एबी फॉर्म नक्की कोणाला दिला? आहे याची माहिती कोणालाच लागताना दिसत नव्हती.
कोळे, वारुंजी आणि कार्वेचे गणित बसेना
काँग्रेसला गट आणि गण किती अन् राष्ट्रवादीला गट अन् गण किती यावर नेतेमंडळींच्यात चर्चाच सुरू आहे. प्रामुख्याने कोळे, वारुंजी आणि कार्वे या तीन गटांतील उमेदवारीवरून नेत्यांच्यात मतभिन्नता आहे. त्यांच्यात एकमत होताना दिसत नाही. म्हणून सरतेशेवटी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय; पण हे तर ‘प्रेशर पॉलिटिक्स’ असल्याचे मत अनेक जाणकार व्यक्त करीत आहेत.

Web Title: Krishna's heart does not end till the end of the 'horse race'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.