कोल्हापुरात केएसए फुटबॉल लीग : तुल्यबळ सामन्यांमुळे फुटबॉलप्रेमींची प्रचंड गर्दी
By संदीप आडनाईक | Updated: January 3, 2025 21:32 IST2025-01-03T21:31:55+5:302025-01-03T21:32:19+5:30
पाटाकडील-दिलबहार बरोबरीत, प्रॅक्टीसची बीजीएम स्पोर्टसवर २-० गोलने मात

कोल्हापुरात केएसए फुटबॉल लीग : तुल्यबळ सामन्यांमुळे फुटबॉलप्रेमींची प्रचंड गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेत शुक्रवारी पाटाकडील तालीम मंडळ(अ) आणि दिलबहार तालीम मंडळ (अ) यांच्यातील तुल्यबळ सामना १-१ असा बरोबरीत सुटला तर पहिल्या सत्रातील सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (अ) संघाने बीजीएम स्पोर्टसवर २-० गोलने मात केली.
छत्रपती शाहू स्टेडियमवर शाहू छत्रपती केएसए ए डिव्हीजन फुटबॉल लीग स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित दुपारच्या सत्रातील पाटाकडील तालीम मंडळ(अ) विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ (अ) यांच्यातील दुसरा सामना अत्यंत चुरशीचा झाला. दोन्ही संघ तुल्यबळ असल्यामुळे हे सामने पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. दोन्ही सामने पूर्वर्धात आणि उत्तरार्धात अत्यंत वेगवान पध्दतीने खेळले गेले. स्पर्धेला सुरुवात करण्यापूर्वी उमेश चोरगे, आनंदराव पाटील, यशवंत कातवरे, उमेश भगत या नामवंत फुटबॉलपटूंना श्रध्दांजली वाहण्यात आली.
पूर्वाधात पाटाकडील तालीम मंडळाच्या संघाकडून झालेल्या खोलवर चढाया दिलबहार 'दिलबहार'च्या सतेज साळोखे, शोएब बागवान, स्वयम साळोखे, सुशांत अतिग्रे, ॲलेक्स मोंडल यांनी रोखल्या. पाटाकडीलच्या यश देवणे, ऋषिकेश मेथे-पाटील, अर्शद अली, नबी खान, ओंकार पाटील, प्रथमेश हेरेकर, संदेश कासार यांनी वेगवान चढाया गेल्या. छोट्या डीमधून मारलेला जोरदार चेंडू दिलबहारचा गोलीने उत्कृष्टरित्या रोखल्यामुळे अर्शद अलीची गोल करण्याची संधी वाया गेली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघाची पाटी कोरीच होती. उत्तरार्धातही पाटाकडील कडून चढाया सुरुच राहिल्या. परंतु ४५ व्या मिनिटाला संदेश कासार याने दिलबहारची बचाव फळी भेदत अर्शदच्या पासवर मैदानी गोल करून १-० अशी आघाडी मिळवताच मैदानात जल्लोष झाला. त्याला प्रत्युत्तर देत सामना संपण्यासाठी पाच मिनिटांचा अवधी राहिला असताना ॲलेक्स मोंडालच्या पासवर दिलबहारच्या स्वयंम साळोखे याने पाटाकडीलच्या खेळाडूंना चकवा देत ५९ व्या मिनिटाला गोल नोंदवत निर्धारीत वेळेत पाटाकडीलशी १-१ अशी बरोबरी साधली. स्वयंम साळोखे याच्या या गोलमुळे संघातील खेळाडूंनी मोठा जल्लोष केला.
'प्रॅक्टीस'चा 'बीजीएम'वर २ गोलनी विजय
दरम्यान, सकाळच्या सत्रातील पहिला सामना प्रॅक्टिस क्लबने एकतर्फीच जिंकला. प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (अ) संघाने बीजीएम स्पोर्टसवर २-० गोलने मात केली. पूर्वार्धात दोन्ही संघ एकही गोल करु शकले नाहीत. उत्तरार्धात ५० व्या मिनिटाला प्रॅक्टिस क्लबच्या सागर चिले याने बीजीएम स्पोर्टसवर गोल करुन आघाडी घेतली. त्यानंतर अनिकेत कोळी याने ६२ व्या मिनिटाला दुसरा गोल करुन घेतलेली आघाडी कायम राहिली. प्रॅक्टिसच्या सूरज जाधव, मारुती कोळी, पार्थ देसूरकर, सुमित घोष यांनी चढाया केल्या. बीजीएमच्या ओंकार पाटील, वैभव राउत, शिवतेज साठे, रोहित मालाडी यांनी प्रयत्नांशी शिकस्त केली. अजिंक्य गुजर, संदीप पोवार, योगेश हिरेमठ, राहूल तिवले यांनी पंच म्हणून काम केले. विजय साळुखे निवेदक होते.