केएसए वरिष्ठ गट फुटबॉल सामना : खंडोबा तालीम मंडळ ‘ब’ विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:06 PM2019-12-31T12:06:24+5:302019-12-31T12:08:52+5:30
केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळ ‘ब’ संघाने मंगळवार पेठ फुटबॉल क्लब संघावर ३ - २ अशा गोल फरकाने मात केली.
कोल्हापूर : केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळ ‘ब’ संघाने मंगळवार पेठ फुटबॉल क्लब संघावर ३ - २ अशा गोल फरकाने मात केली.
छत्रपती शाहू स्टेडियमवर केएसएच्यावतीने वरिष्ठ गट फुटबॉल साखळी सामन्यात खंडोबा तालीम मंडळ ‘ब’ विरुद्ध मंगळवार पेठ फुटबॉल क्लब यांच्यामध्ये सामना खेळविण्यात आला. सामन्याच्या प्रारंभापासूनच दोन्ही संघांमधील आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी आक्रमक खेळी करीत सामन्यावर पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
सामन्याच्या आठव्या मिनिटाला खंडोबा तालीम मंडळाच्या सूर्यप्रकाश सासनेने गोल नोंदवीत संघाचे खाते उघडले. गोलची परतफेड करण्यासाठी मंगळवार पेठ फुटबॉल क्लबच्या खेळाडूंनी आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली. यामध्ये आदित्य लाडने सामन्याच्या २४ व्या मिनिटाला गोल नोंदवीत सामना १-१ अशा गोल फरकाने बरोबरीत केला.
पुढच्याच मिनिटाला खंडोबा ‘ब’ संघाच्या दिग्विजय असणेकर याने गोल नोंदवून संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतरदेखील दोन्ही संघांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला. सामन्याच्या ३६ व्या मिनिटाला मंगळवार पेठ संघाकडून महेश चोरगेने गोल नोंदवीत सामना २-२ अशा गोल फरकाने बरोबरीत केला. मध्यंतरापर्यंत सामना बरोबरीत होता.
उत्तरार्धात दोन्हीही संघांतील खेळाडूंनी चढाईत सातत्य ठेवत दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ‘खंडोबा’कडून प्रणव घाडगे, प्रथमेश पाटील, तर मंगळवार पेठकडून नितीन पोवार, आदिल लाड, महेश चोरगे यांनी शर्तीचे प्रयत्न सुरूकेले. मात्र, त्यांच्या चढाया फोल ठरल्या. सामन्याच्या ७२ व्या मिनिटाला खंडोबा संघाच्या रुद्रेश मांद्रेकर याने संघाचा तिसरा गोल करीत संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिली.
सामन्याला दोन दिवस सुट्टी
३१ डिसेंबर व एक जानेवारी रोजी सामन्याला सुट्टी राहील. दोन जानेवारी रोजी कोल्हापूर वि. मंगळवारपेठ, दुपारी २ वा., पीटीएम अ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ, दुपारी ४ वा. यामध्ये सामना खेळविण्यात येणार आहे.