के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धा;बालगोपाल, ‘बीजीएम’ची आगेकूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 01:54 PM2019-12-27T13:54:57+5:302019-12-27T13:56:29+5:30
के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत अभिनव साळोखे, रोहित कुरणे यांच्या गोलच्या जोरावर बालगोपाल तालीम मंडळाने संयुक्त जुना बुधवार पेठ संघाचा ३-१ असा, तर बी.जी.एम. स्पोर्टसने मंगळवार पेठ फुटबॉल क्लबचा ३-० असा पराभव केला.
कोल्हापूर : के.एस.ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत अभिनव साळोखे, रोहित कुरणे यांच्या गोलच्या जोरावर बालगोपाल तालीम मंडळाने संयुक्त जुना बुधवार पेठ संघाचा ३-१ असा, तर बी.जी.एम. स्पोर्टसने मंगळवार पेठ फुटबॉल क्लबचा ३-० असा पराभव केला.
शाहू छत्रपती स्टेडियमवर सुरू असलेल्या स्पर्धेत गुरुवारी बालगोपाल व संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून बालगोपाल संघाचे वर्चस्व राहिले. यात वैभव राऊत, सूरज जाधव, रोहित कुरणे, मनीष मलिक, ऋतुराज पाटील, अभिनव साळोखे यांनी चढाया केल्या.
सातव्या मिनिटास सूरज जाधवच्या पासवर अभिनव साळोखे याने गोल करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर सामन्यात बरोबरी साधण्यासाठी जुना बुधवार संघाकडून रिचमोंड, अकील पाटील, सनी शिबू, रोहन कांबळे, सुमित घाटगे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले नाही. उलट २१ व्या मिनिटास ‘बालगोपाल’कडून ऋतुराज पाटीलने दिलेल्या पासवर रोहित कुरणे याने गोल करीत संघाची आघाडी २-० ने वाढविली.
दरम्यान, जुना बुधवारकडून सुमित घाटगे याने मारलेला फटका ‘बालगोपाल’चा गोलरक्षक अक्षय कुरणे याने उत्कृष्टरीत्या अडविला. सामन्याच्या ३१ व्या मिनिटास ‘बालगोपाल’कडून अभिनव साळोखेच्या पासवर रोहित कुरणे याने गोल करीत संघाला ३-० अशी भक्कम आघाडी पूर्वार्धातच मिळवून दिली. उत्तरार्धात तीन गोलचे ओझे घेऊन खेळणाऱ्या जुना बुधवारकडून सामन्यात आघाडी कमी करण्यासाठी नियोजनबद्ध खेळी करण्यात आली.
या खेळीस ६९ व्या मिनिटास यश आले. मोठ्या गोलक्षेत्राबाहेरून सनी शिबू याने मारलेल्या फटका ‘बालगोपाल’च्या गोलरक्षकास अडविता आला नाही. त्याच्या हाताला लागून चेंडू गोलजाळ्यात थेट गेला. त्यामुळे सामन्याची स्थिती ३-१ अशी झाली. हीच गोलसंख्या अखेरपर्यंत राहिल्याने सामना ‘बालगोपाल’ने जिंकला.
बी.जी.एम. स्पोर्टस व मंगळवार पेठ फुटबॉल क्लब यांच्यात झालेला सामना बी.जी.एम.ने ३-० असा एकतर्फी जिंकला. उत्तरार्धात बी.जी.एम.कडून २० व्या मिनिटास जॉन्सन जोशोने गोल करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात बी.जी.एम.कडून ७२ व ८० व्या मिनिटास अभिजित साळोखे याने गोल करीत संघाची आघाडी ३-० अशी भक्कम केली.
‘मंगळवार’कडून आदित्य लाड, शिवम पोवार, यशराज कांबळे यांनी आघाडी कमी करण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना अखेरपर्यंत यश आले नाही. या उलट बी.जी.एम.कडून सुयश हांडे, विशाल पाटील, ओंकार खोत, जॉन्सन जोशो, अनिकेत मगदूम यांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत ३-० या गोलसंख्येवर सामना खिशात घातला.