क्षीरसागर-पवार यांच्यात पुन्हा ठिणगी

By admin | Published: September 9, 2015 12:18 AM2015-09-09T00:18:14+5:302015-09-09T00:18:14+5:30

मानसन्मान मिळत नसल्याची तक्रार : संजय पवारांसह समर्थक कार्यक्रम सोडून परतले

Kshirsagar-Pawar resumes sparks again | क्षीरसागर-पवार यांच्यात पुन्हा ठिणगी

क्षीरसागर-पवार यांच्यात पुन्हा ठिणगी

Next

कोल्हापूर : शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यातील वर्चस्वाचा वाद मंगळवारी दुपारी पुन्हा उफाळून आला. त्यातूनच शहरप्रमुख शिवाजी जाधव यांच्या ताराबाई रोडवरील संपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ सुरू होण्यापूर्वीच पवार यांच्यासह त्यांचे समर्थक कार्यक्रम सोडून निघून गेले.आमदार क्षीरसागर व पवार यांच्यात पक्षनेतृत्वाने समझोता घडवून आणला व पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकदिलाने काम करण्याचे आदेश दिले; परंतु हे मनोमिलन झाले नसल्याचेच दिसून येत आहे. मंगळवारी दुपारी आमदार क्षीरसागर यांचे समर्थक शहरप्रमुख जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होते. शिंदे कार्यक्रमस्थळी यायचे होते. पण, अगोदरच संजय पवार, कमलाकर जगदाळे, दत्ता टिपुगडे, शशी बिडकर, रणजित आयरेकर, आदी कार्यकर्ते गेले. तिथेही पवार यांचे फलकावर छायाचित्र नसल्याचे पाहून त्यांच्या समर्थकांचा राग उफाळून आला.
आमदार समर्थकांकडून शहरात जे फलक लावले आहेत, त्यावरही जाणीवपूर्वक पवार यांचे छायाचित्र वापरले जात नाही किंवा जाणीवपूर्वक ते खालच्या बाजूस वापरण्यात येत असल्याचे या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. संपर्क कार्यालय उद्घाटनाच्या निमंंत्रण पत्रिकेतही माजी जिल्हाप्रमुख विजय कुलकर्णी यांच्या नावाखाली पवार यांचे नाव वापरण्यात आले आहे. त्याचाही जाब कार्यकर्त्यांनी विचारला. तुम्हाला पवार यांच्याबद्दल राग असेल तर समजू शकतो, परंतु किमान पदाचा तरी अवमान करू नका, असे कार्यकर्त्यांनी सुनावले. त्यानंतर आमदार गटाच्या तिथे उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. गैरसमज करू नका, जाणीवपूर्वक काही केले नसल्याचे सांगण्यात आले; परंतु पवार यांचे कार्यकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. ते या उद्घाटन समारंभास उपस्थित न राहताच निघून गेले. सायंकाळच्या मेळाव्यास मात्र ते उपस्थित होते. सायंकाळी मंत्री एकनाथ शिंदे यांनीही मतभेद गाडून टाकण्याचे आवाहन मेळाव्यात केले.

Web Title: Kshirsagar-Pawar resumes sparks again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.