केएमटीचा १९ गावांना ‘ब्रेक’!
By admin | Published: May 30, 2014 01:48 AM2014-05-30T01:48:04+5:302014-05-30T01:56:44+5:30
रविवारपासून अंमलबजावणी : एक कोटी सहा लाख रुपयांच्या थकबाकीसाठी बससेवा बंद
कोल्हापूर : के.एम.टी.कडे असणार्या खासगी ठेकेदारांनी थकबाकीसाठी २० मे पासून ३० बसेसची सेवा बंद केली आहे. परिणामी, शहरातील मार्गांवर प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी के.एम.टी. प्रशासनाने नव्या बसेस येईपर्यंत ग्रामीण भागातील १९ गावांतील बससेवा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शहरातील अनेक बसमार्गांत बदल केला आहे. त्यामुळे प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन के.एम.टी. प्रशासनाने केले आहे. के.एम.टी.कडे असणार्या ३० खासगी बसेस ठेकेदारांनी एक कोटी सहा लाख रुपयांच्या थकबाकीसाठी बससेवा बंद केली आहे. यामुळे दररोज किमान सव्वादोन लाखांहून अधिकचे नुकसान सोसणार्या के.एम.टी.पुढील अडचणी वाढल्या. यातच ८५० कर्मचार्यांचा तीन महिन्यांचा पगार थकला आहे. के.एम.टी.च्या बॅँकेतील खात्यावर एक रुपायाही नाही. कालचे उद्या भागवून विनंतीवर डिझेल घेऊन कसाबसा के.एम.टी.चा प्रवास सुरू आहे. के.एम.टी.च्या अडचणींमुळे प्रवाशांचे हाल नकोत, यासाठी काही भागांतील बससेवा बंद करणे, तसेच शहरातील काही मार्गांत बदल करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. के.एम.टी.च्या ताफ्यात नवीन बसेस येईपर्यंत हा बदल राहणार असल्याचे व्यवस्थापनाने पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)