केएमटी दुर्घटना : तिघांची प्रकृती अद्याप अत्यवस्थच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 05:59 PM2017-10-02T17:59:10+5:302017-10-02T18:08:11+5:30
पापाची तिकटी ते गंगावेश दरम्यान ताबूत विसर्जन मिरवणुकीत केएमटी बस घुसल्याने झालेल्या दुर्घटनेतील जखमी झालेल्या २१ पैकी १३ जणांवर सीपीआर, अॅस्टर आधार आणि राजारामपुरीतील सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती अद्याप अत्यवस्थ आहे. तर इतरांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
कोल्हापूर, 2 : पापाची तिकटी ते गंगावेश दरम्यान ताबूत विसर्जन मिरवणुकीत केएमटी बस घुसल्याने झालेल्या दुर्घटनेतील जखमी झालेल्या २१ पैकी १३ जणांवर सीपीआर, अॅस्टर आधार आणि राजारामपुरीतील सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती अद्याप अत्यवस्थ आहे. तर इतरांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
प्रकृती गंभीर असलेल्यांमध्ये आनंदा राऊत (वय ५५), पृथ्वीराज अरविंद भंडारी (१४), साहिल घाटगे (१४, सर्व रा. राजारामपुरी, तिसरी गल्ली) यांचा समावेश आहे. नेहमी गजबजलेल्या पापाची तिकटी ते गंगावेश या मार्गावर रविवारी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास ताबूत विसर्जन मिरवणुकीत भरधाव केएमटी बस घुसल्याने दोनजण जागीच ठार झाले. तर एकूण १८ जण जखमी झाले.
संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीच्या हल्ल्यात एक महिला पोलीस अधिकारी, अग्निशमन दलाच्या गाडीचा चालक व एस. टी. बसचालक जखमी झाले. अशा एकूण २१ जखमींपैकी आठजणांवर प्रथमोपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. तर इतर १३ जखमींपैकी आठजणांवर प्रथमपोचार करून त्यांना सोमवारी पहाटे खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी स्थलांतरित करण्यात आले. त्यापैकी शास्त्रीनगरमधील अॅस्टर आधार रुग्णालयात सहा रुग्ण, तर राजारामपुरीतील सिटी रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केएमटीचे अपघात विभागप्रमुख व माजी सैनीक पी. बी. जाधव यांनी दिली.
प्रकृती गंभीर असलेल्यांमध्ये आनंदा राऊत (वय ५५) यांच्यावर सिटी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या मेंदूत अतिरक्तस्त्राव झाला आहे. त्यावर शस्त्रक्रिया करण्यात अडचण असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर औषधोपचार करून त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या ते व्हेंटिलेटरवर असून, त्यांची प्रकृती अधिक गंभीर होत असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले.
सिटी रुग्णालयात साहिल घाटगे या मुलाच्या दोन्ही पायांवरही सोमवारी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यांच्याही पायावरून बसचे चाक गेल्याने पायातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
राजारामपुरीतील पृथ्वीराज भंडारी याही मुलावर अॅस्टर आधार रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याच्याही हाता-पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावरही शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.