‘केएमटी’चा तिमाही पास लवकरच
By admin | Published: February 6, 2015 12:13 AM2015-02-06T00:13:52+5:302015-02-06T00:45:31+5:30
३८ हजार पासधारकांना लाभ : ‘केएमटी’कडेही आगाऊ पैसे जमा होणार
कोल्हापूर : कोल्हापूर म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट (केएमटी)तर्फे येत्या आठ दिवसांत तिमाही पास योजना सुरू करण्यात येणार आहे. शहर व परिसरातील दहा हजार विद्यार्थी व २७ हजार इतर सवलतींचा पास वापरणाऱ्यांचे त्यामुळे हेलपाटे वाचणार आहेत; तर ‘केएमटी’कडे आगाऊ तीन महिन्यांचे पैसे जमा होणार आहेत. या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापक संजय भोसले यांनी केले आहे.रेल्वेप्रमाणे केएमटीनेही तिमाही पासची योजना सुरू करावी, अशी मागणी अनेक पालकांनी ‘लोकमत हेल्पलाईन’द्वारे केली होती. ‘केएमटी’ प्रशासनाने याबाबतची सर्व तांत्रिक प्रक्रिया आता पूर्ण केली आहे. पास केंद्रातून खासगी कंपनीद्वारे पासचे वाटप केले जाते. आर्थिक ओढाताणीमुळे केएमटी प्रशासनाकडून मोठी रक्कम ठेकेदारास देणे लागत असल्याने तिमाही पास योजना रखडली होती. आता केएमटीने ठेकेदारास पहिला ५० हजारांचा हप्ता अदा केला आहे. चार दिवसांत दुसरा हप्ताही दिला जाणार आहे. यानंतर तिमाही पास योजना सुरू केली जाणार असल्याचे प्रभारी व्यवस्थापक संजय भोसले यांनी सांगितले.
‘केएमटी’तर्फे तब्बल दहा हजार शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ४० ते ६० टक्क्यांपर्यंत बसच्या मासिक भाड्यामध्ये सवलत दिली जाते. दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ४० टक्के, सातवी ते दहावीपर्यंत ५० टक्के, तर पहिली ते सातवीपर्यंत ६० टक्के मासिक भाड्यामध्ये ‘केएमटी’ सवलत देते. शहर व परिसरातील विविध महाविद्यालयांत व शाळेत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ
होतो. तसेच इतर २० दिवसांच्या भाड्यात ३० दिवस प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही संख्या तब्बल २७ हजार इतकी आहे.
पासधारकांच्या संख्येच्या मानाने ‘केएमटी’च्या पास वाटप केंद्रांची संख्या खूपच तोकडी आहे. फक्त महाराणा प्रताप चौक येथेच सवलतीचा पास मिळतो. पाससाठी तब्बल चार-चार तास ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे शाहू मैदान चौक येथे लवकरच आणखी एक पास वाटप केंद्र सुरू होणार असल्याचे व्यवस्थापक संजय भोसले यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)