कुडकुडणारं पोरगं... अन्‌ मिठारीतात्यांची मायेची ऊब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:45 AM2021-03-04T04:45:55+5:302021-03-04T04:45:55+5:30

ज्योती पाटील पाचगाव : एका भल्या सकाळी एक अंत्ययात्रा पंचगंगा घाटावरून जात असताना घाटावर एका नऊ-दहा वर्षांच्या मुलाचे मुंडन ...

Kudkudanaram Porang ... And the sweetness of the sweethearts | कुडकुडणारं पोरगं... अन्‌ मिठारीतात्यांची मायेची ऊब

कुडकुडणारं पोरगं... अन्‌ मिठारीतात्यांची मायेची ऊब

Next

ज्योती पाटील

पाचगाव : एका भल्या सकाळी एक अंत्ययात्रा पंचगंगा घाटावरून जात असताना घाटावर एका नऊ-दहा वर्षांच्या मुलाचे मुंडन सुरू होते. ऐन थंडीत गारेगार पाणी डोक्यावर पडल्याने ते कोवळे पाेर अक्षरश: थंडीने कुडकुडले... या थंडगार पाण्याने बालमनाला केलेल्या वेदनांनी या अंत्ययात्रेतील एकाचे मन हेलावून गेले... अन्‌ त्यानं तात्काळ पंचगंगा घाटावर सोलरची सुविधा उपलब्ध करून देत पंचगंगा स्मशानभूमीत कायमची मायेची ऊब जोपासली... संभाजी पांडुरंग जाधव ऊर्फ मिठारीतात्या असे या दातृत्वाचे नाव. फुलेवाडीत राहणारे जाधव या परिसरात मिठारीतात्या या नावाने ओळखले जातात. थोडी शेती आणि पिठाची गिरण चालवून आपला उदरनिर्वाह करणारे पन्नाशीच्या पुढचे तात्या तसे समाजाभिमुख. कोणाच्याही अडचणीला धावून जाणारे. फुलेवाडी ते रिंग रोड भागात कोणाचेही निधन झाले की, तात्या तिथे हजर. शेवटच्या घडीला आपण त्याला साथ दिली नाही, तर आजवर त्याने मला तोंडभरून हाक मारलेल्या, त्या हाकेला काही अर्थ राहील का? हे स्वत:चेच ब्रीद अनेकांना ऐकवून तात्या अंत्यविधीचे सगळे सोपस्कार पार पाडण्यात हातभार लावणार. पंचगंगा स्मशानभूमीत मिठारीतात्यांनी स्वखर्चाने सोलर उपलब्ध करून दिल्याने सकाळच्या वेळी येथे होणाऱ्या विधिकार्यातील स्नानासाठी गरम पाणी मिळत आहे. त्यामुळे उतरत्या वयातही माणुसकीचे बंध निर्माण करण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार आदर्शवत ठरला आहे.

चौकट : कमाईतील वाटा मदतीसाठी : एका हाताने केलेली मदत दुसऱ्या हातालाही कळू न देणाऱ्या तात्यांना तशी इतरांकडून कोणतीच अपेक्षा नाही. आपणच समाजाचे देणे लागतो, ही भावना त्यांच्या ठायी पक्की दृढ आहे. त्यामुळेच पिठाच्या गिरणीतून जेमतेम उत्पन मिळत असले तरी त्यातूनही ते इतरांना मदत करण्यासाठी काही रक्कम काढून ठेवतात.

कोट :

पंचगंगा घाटावर माणुसकीच्या भावनेतून सोलर उभारला आहे. हा सोलर सर्वांच्या उपयोगी पडावा.

-संभाजी पांडुरंग जाधव (मिठारीतात्या)

०३ पंचगंगा स्मशानभूमी सोलर :

ओळ : फुलेवाडी येथील संभाजी जाधव यांनी पंचगंगा स्मशानभूमीत उभारलेला सोलर.

Web Title: Kudkudanaram Porang ... And the sweetness of the sweethearts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.