Kolhapur: आईच्या स्मरणार्थ दिली होती २५ लाखांची देणगी, राजाराम तलावात जीवन संपवलेल्या कुलकर्णी बहीण-भावाचे दातृत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 02:18 PM2024-08-17T14:18:15+5:302024-08-17T14:19:32+5:30
कोल्हापूर : स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी राजारामपुरी पोलिस ठाण्यात वर्दी मिळाली. दोन मृतदेह राजाराम तलावात तरंगत आहेत म्हणून. पाठीवरच्या सॅकमधील ...
कोल्हापूर : स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी राजारामपुरी पोलिस ठाण्यात वर्दी मिळाली. दोन मृतदेह राजाराम तलावात तरंगत आहेत म्हणून. पाठीवरच्या सॅकमधील कागदपत्रांवरून ओळख पटली आणि दुपारी १२च्या सुमारास दोन्ही मृतदेह सीपीआरच्या शवविच्छेदनगृहासमोर घेऊन रुग्णवाहिका उभी होती. संध्याकाळी शवविच्छेदन झाले आणि ‘आम्ही आईकडे जातो’ असे म्हणत उच्चशिक्षित भूषण कुलकर्णी आणि भाग्यश्री कुलकर्णी हे बहीण भाऊ अनंतात विलीन झाले. त्यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या या प्रिय आईच्या स्मरणार्थ वाईच्या प्राज्ञपाठ शाळा मंडळाला तब्बल २५ लाख रुपयांची देणगी दिली होती.
या दोघांच्या मातोश्री पद्मजा निळकंठ कुलकर्णी. इतिहास विषयातील एम. ए. व्होकल म्युझिकमध्येही पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पूर्ण केले होते. शास्त्रीय संगीत, ज्योतिषशास्त्राचाही त्यांचा अभ्यास होता. संस्कृत हा तर त्यांच्या खूपच आवडीचा विषय होता. आपल्याजवळील धनाचा साठा गरजूंसाठी करावा अशी त्यांची भूमिका होती. पद्मजा यांचे दि. २४ मे २४ रोजी निधन झाले. त्यांच्या दोन्ही मुलांनी उच्चशिक्षित असूनही लग्नं केली नव्हती. त्यामुळेच भूषण आणि भाग्यश्री यांचे जग हे आईपुरतेच सीमित होते. त्यामुळे आईच्या निधनानंतर हे दोघेही सैरभैर झाले. नाळे कॉलनीतील ‘वरदा’ बंगल्यात हे तिघेच. यातूनच त्यांनी जीवनच संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचे त्यांनीच लिहिलेल्या सुसाइड नोटवरून स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे आई गेल्यानंतरही या दोघांनीही तिच्या आवडीच्या संस्कृत विषयाशी संबंधित अशा वाई येथील प्राज्ञपाठ शाळा मंडळाला २५ लाखांची देणगी दिली. भाग्यश्री या वकील होत्या.